विद्युल्लता पंडित वर्दे पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2017 06:02 AM2017-01-02T06:02:21+5:302017-01-02T06:02:21+5:30
श्रमजीवी संघटना-महाराष्ट्र आणि विधायक संसद या संस्था संघटनेच्या संस्थापिका व श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या विद्युल्लता पंडित यांना ‘साने गुरूजी आरोग्य मंदिर’
वसई/पारोळ : श्रमजीवी संघटना-महाराष्ट्र आणि विधायक संसद या संस्था संघटनेच्या संस्थापिका व श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या विद्युल्लता पंडित यांना ‘साने गुरूजी आरोग्य मंदिर’ या संस्थेकडून ‘सुधाताई व सदानंद वर्दे पुरस्कार’ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आणि महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्यायाच्या चळवळीत जीवनाच्या अखेरपर्यंत समर्पित भावनेने कार्यरत राहिलेले स्व. सदानंद आणि सुधा वर्दे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मानाचा आहे.
विद्युल्लता पंडित यांनी पती व श्रमजीवींचे नेते आणि वसई चे माजी आमदार विवेक पंडित यांच्या साथीने ३७ वर्षांपूर्वी या दोन्ही संस्था-संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. याच माध्यमातून ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, मुंबई उपनगर या जिल्ह्यांतील हजारो उपेक्षित श्रमजीवी, आदिवासी, शेतमजूर स्थलांतरित वीटभट्टी मजूर, बालमजूर, विकासापासून वंचित असलेल्या श्रमजीवी मजूर महिलांच्या न्याय्य हक्क आणि सन्मानासाठी कार्य केले. पुरस्कार जाहिर झाल्याने श्रमजीवी संघटना-महाराष्ट्र आणि विधायक संसदच्या परिवाराला आनंद झाला असल्याचे संघटक सचिव किसन चौरे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी लग्नगड्यांना सावकारीच्या व मराठवाड्यातील हजारो मजुरांना जातीय वेठबिगारीच्या जुलमी पाशातून मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत लंडन येथील गुलामी विरोधी आंतरराष्ट्रीय संघटनेने १९९९ साली गुलामी विरोधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. (प्रतिनिधी)