नव्या पिढीला खुणावतेय इलेक्ट्रॉनिक मीडियातील करिअर
By admin | Published: June 28, 2017 03:05 AM2017-06-28T03:05:04+5:302017-06-28T03:05:04+5:30
भारताच्या संज्ञापन आणि माध्यम विश्वात टीव्हीची जागा युरोप आणि अमेरिकेपेक्षा वेगळी आहे. भारतातील बहुतांश घरांमधे टीव्ही हा समोरच्या खोलीत असतो.
भारताच्या संज्ञापन आणि माध्यम विश्वात टीव्हीची जागा युरोप आणि अमेरिकेपेक्षा वेगळी आहे. भारतातील बहुतांश घरांमधे टीव्ही हा समोरच्या खोलीत असतो. घरातील या खोलीत एका भिंतीला लागून कपाट आणि टेबल असते. टेबलावर टीव्ही असतो. टीव्हीपासून पाहण्याचे अंतर फार तर सहा ते आठ फूट असते. काही घरात टीव्ही पाहणारे वेगवेगळ्या उंचीवरून टीव्ही पाहतात. काही समोरून, काही मान किंचित वर करून. टीव्ही समोरून पाहिला जातो तसाच तो कडेतूनही पाहिला जातो. टीव्ही पाहताना इतर अनेक कामे होत असतात. जेवण तयार होत असते, कपडे धुण्याचे मशीन सुरू असते, भाजी निवडली जात असते. अशी अनेक कामे घरातील स्त्री-पुरुष करीत असतात. टीव्ही पाहणारे एकाच वेळी वेगवेगळे कार्यक्रम पाहत असतात. त्यामुळे जाहिराती आल्या की चॅनेल बदलण्याची शक्यता खूप असते. टीव्हीवर कुठला कार्यक्रम पाहिला जाईल आणि रीमोटवर कोणाचे नियंत्रण असेल याची एक प्रकारची स्पर्धाच होत असते. यात घरातील व्यक्तींचे वय, त्यांचे घरातील स्थान, लिंग इत्यादी महत्त्वाचे ठरतात.
हे सगळे इतक्या विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे टीव्ही कसा पाहिला जातो, त्यावरील कार्यक्रम कोण, कधी, किती वेळ पाहणार याचा परिणाम टीव्हीवरील कार्यक्रम व विषय निर्मितीवर होत असतो. टीव्ही फिल्डमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांनी हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
आज भारतामध्ये शेकडो चॅनेल आहेत. त्यांवरील कार्यक्रमात बऱ्यापैकी वैविध्य असते. मात्र टीव्हीसमोर बसून तो पाहण्यासाठी लागणारा वेळ कोणाकडे आहे? तर तसा वेळ घरातील वयोवृद्ध, अगदी लहान मुले आणि गृहिणी यांच्याकडे असतो. यातील केवळ लहान मुले आणि गृहिणींकडे खर्च करण्याची किंवा खर्च करवून घेण्याची क्षमता अधिक असते. तरुण आणि मध्यमवयीन स्त्री-पुरुष हे टीव्हीपासून दूर राहतात. मग ते टीव्हीवरील कार्यक्रम कुठे व कसे पाहतात? हातातील मोबाइल फोन, संगणक किंवा अशाच इतर डिव्हाईसेसवर हे लोक टीव्हीचे कार्यक्रम पाहतात.
वरील विवेचनातून आपल्याला लक्षात येईल, की टीव्हीमध्ये काम करू इच्छिणाऱ्याला टीव्हीचे उपभोक्ते देखील समजून घेणे आवश्यक ठरणार आहे. टीव्हीचा उपभोग काळानुरूप बदलत जातो. त्यानुसार कार्यक्रमांचे विषय व त्यांची हाताळणी आणि मांडणी बदलत जाते. टीव्हीच्या अर्थकारणाची काही वैशिष्ट्ये आहेत. टीव्ही हा मुळात जाहिरात प्रसारण करणारा आहे. जाहिरातींशिवाय टीव्ही नाही. याचे कारण टीव्हीसाठी लागणारी यंत्रणा खूप मोठी आणि खर्चीक असते.
साधारणपणे टीव्हीवरील कार्यक्रम निर्मितीवरील खर्च हा एकूण खर्चाच्या तुलनेत फारच कमी असतो. उदाहरणार्थ टीव्हीवर बातम्या प्रसारित होतात. त्या बातम्या तयार करण्याच्या यंत्रणेत माणसांवरील खर्च नगण्य असतो. जेमतेम दहा-बारा टक्के खर्च माणसांवर होतो. इतर सर्व खर्च तंत्रज्ञानावर होत असतो. ही सध्याची भारतातील स्थिती आहे. सर्वच चॅनेलवर ‘टॉक-शो’ का होतात? याचे कारण या प्रकारच्या कार्यक्रमाचा उत्पादन खर्च सर्वांत कमी असतो. त्याचप्रमाणे रिअॅलिटी शो किंवा लाइव्ह शो करण्यामागचे कारणही तेच आहे. सामान्य माणसांना हीरो केले की खर्च कमी. कारण ती माणसे आपापले उपभोक्ते घेऊन येतात. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येकालाच पाच मिनिटे का होईना, जगभरात प्रसिद्धी मिळावी, असे वाटत असते. ती संधी टीव्हीवर मिळते.
टीव्हीत काम करू इच्छिणाऱ्यांनी त्यातील तंत्रज्ञान अवगत असणे अतिशय आवश्यक असते. त्याला पर्याय नाही. हे तंत्रज्ञान शिकणे आता तितकेसे कठीण नाही. घरच्या घरीसुद्धा हे करता येते. मोबाइल फोनचा वापर करून आपल्याला आता चित्रपट तयार करता येतो! त्यामुळे टीव्हीत काम करणे आणि टीव्हीवर झळकणे यात फरक आहे. टीव्हीत खरी सत्ता कॅमेऱ्याच्या मागे असते, समोर नाही.
टीव्हीवरील ‘स्टार’ अचानक नाहीसे होतात, जलद गतीने विस्मृतीत जातात. कुठल्याही प्रयोगाचा मृत्यू टीव्हीवर घडवून आणावा लागतो. नाहीतर टीव्हीचे अर्थकारण बिघडते. टीव्हीत काम करण्यासाठी काही कौशल्ये आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे टीव्हीवर झळकण्यासाठीही काही कौशल्ये आवश्यक आहेत.
- प्रा. डॉ. संजय रानडे,
(लेखक मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख आहेत.)