एलिफंटा बोट दुर्घटनेतील काही मृतांची ओळख पटली, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 23:43 IST2024-12-18T23:42:14+5:302024-12-18T23:43:01+5:30
Elephanta Boat Accident: मुंबईजवळील समुद्रात बुचर बेटांजवळ एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

एलिफंटा बोट दुर्घटनेतील काही मृतांची ओळख पटली, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश
मुंबईजवळील समुद्रात बुचर बेटांजवळ एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये ७ पुरुष, ४ महिला आणि २ लहान मुलांचा समावेश असून, मृतांपैकी काहींची ओळख पटवण्यात यश आलं आहे. मृतांमध्ये १० पर्यटक प्रवाशांसह नौदलाच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या काही जणांची नावं समोर आली आहेत. या दुर्घटनेतील मृतांमध्ये महेंद्रसिंग शेखावत ( नौदल), प्रवीण शर्मा (NAD बोट वरील कामगार), मंगेश (NAD बोट वरील कामगार), मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट), राकेश नानाजी अहिरे( प्रवासी बोट), साफियाना पठाण (मयत महिला), माही पावरा (मयत मुलगी वय-३ ), अक्षता राकेश अहिरे, मिथु राकेश अहिरे (८ वर्षे), दिपक व्ही यांची ओळख पटली आहे. तर मृतांमधील एक पुरुष आणि दोन महिलांची ओळख पटलेली नाही.
दरम्यान, नौदलाच्या पेट्रोलिंग बोटीवरील चालक आणि सबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौदलाच्या बोटीवर सहा जण होते. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईजवळील समुद्रात असलेल्या बुचर बेटांजवळ आज ३ वाजून ५५ मिनिटांनी नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या एका बोटीने धडक दिल्याने मोठा अपघात झाला. संध्याकाळी ७.३० पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामधून आतापर्यंत १०१ जणांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आलं आहे. मात्र या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या १३ लोकांमध्ये १० नागरिक आणि ३ नौदलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय दोन जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. त्यांना नौदलाच्या रुग्णालयातच दाखल करण्यात आलं आहे.