हत्ती बिथरताच पळापळ !
By admin | Published: January 4, 2015 02:07 AM2015-01-04T02:07:31+5:302015-01-04T02:07:31+5:30
एका बाजूला ‘यळकोट-यळकोट जय मल्हार’चा गजर सुरू असतानाच पालच्या खंडोबा यात्रेत मानाचा हत्ती बिथरल्यामुळे लाखो भाविकांनी पंधरा मिनिटांचा थरार अनुभवला.
शशिकांत ठेंगे - काशीळ
एका बाजूला ‘यळकोट-यळकोट जय मल्हार’चा गजर सुरू असतानाच पालच्या खंडोबा यात्रेत मानाचा हत्ती बिथरल्यामुळे लाखो भाविकांनी पंधरा मिनिटांचा थरार अनुभवला. पाल यात्रेच्या इतिहासात यापूर्वी अशा दोन घटना घडल्या होत्या; मात्र त्यावेळी कुणाचाही मृत्यू झाला नव्हता. यंदाची घटना मात्र भाविकांच्या दृष्टीने खूपच दुर्दैवी ठरली.
यात्रेत घटना घडली त्यानंतर काही क्षणातच अनेकांच्या मोबाईलवर ‘पाल यात्रेत हत्ती बिथरला आणि त्यामध्ये एक महिला ठार अन् पंधरा जखमी’ असा उलटा-सुलटा संदेश येऊ लागला. यानंतर काही क्षणातच अनेक पोलीस ठाण्यात पालमध्ये काही अनुचित प्रकार घडला आहे का, अशी विचारणा होऊ लागली.
पोलिसांना नेमके काय समजून येत नव्हते. सोशल मीडियावरही गाजावाजा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अखेर परिसरातील सर्व मोबाईल यंत्रणाच जाम झाली. मोबाईल यंत्रणा बंद केली की बंद पडली, याविषयी मात्र साशंकता होती.
हत्ती बिथरल्यानंतर सर्वत्र धावाधाव सुरू झाली. यावेळी पोलीस मंदिराच्या टेरेसवर उभे होते. येथून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव
देशमुख आणि अन्य अधिकारी टेहळणी करत होते. त्यांनाही घटनेची नेमकी कल्पना येत नव्हती आणि माहितीही मिळत नव्हती. या ठिकाणच्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.
अशी पटली अजंना कांबळेंची ओळख...
अंजना कांबळे कोल्हापूर जिल्ह्यातील कदमवाडी येथील आहेत. शेजारी सुरेश शंकर नावळे यांच्यासमवेत खंडोबा यात्रेसाठी त्या आल्या होत्या. त्यांच्या समवेत अप्पा रामचंद्र साठे (रा. वेळू, ता. भोर, जि. पुणे) हे नातेवाईक होते. ही दुर्घटना घडली, त्यावेळी सुरेश नावळे आणि अप्पा साठे खंडोबा मंदिर परिसरात होते. नावळे, साठे यांना ही माहिती मिळाल्यानंतर ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले. येथे त्यांनी अंजना कांबळे यांना ओळखले. शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, अंजना कांबळे यांचा मृत्यू झाल्याचे येथे घोषित करण्यात आले.
‘रामप्रसाद’ ३१ वर्षांचा
पालच्या खंडोबा यात्रेत बिथरलेल्या हत्तीचे नाव ‘रामप्रसाद’ असून त्याला १९९0 मध्ये कर्नाटकातून आणले होते. तो येथे आला त्यावेळी त्याचे वय सात वर्षे होते. आजमितीस त्याचे वय ३१ वर्षे आहे. यापूर्वी तो कधीही बिथरला नसल्याची माहिती देवस्थान समिती सदस्य संजय काळभोर यांनी दिली.
मांढरदेव दुर्घटनेची आठवण
पालच्या खंडोबा यात्रेस दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात. त्यामुळे येथील गर्दीवर लक्ष ठेवणे प्रशासनासमोर मोठे आव्हान असते. दरम्यान, पालमध्ये हत्ती बिथरल्यानंतर झालेल्या घटनेची दाहकता काय असेल, या कल्पनेने अनेकांच्या अंगावर शहारे तर आलेच; मात्र त्याच्याच जोडीला नऊ वर्षांपूर्वी २५ जानेवारी २००५ रोजी घडलेल्या मांढरदेव येथील काळूबाई यात्रेतील चेंगराचेंगरीची आठवण झाली.