अकरावी प्रवेशाची ‘आॅफलाइन’ जाहिरातबाजी
By admin | Published: June 29, 2016 12:53 AM2016-06-29T00:53:46+5:302016-06-29T00:53:46+5:30
विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करणारी जाहिरातबाजी केल्याबद्दल शिक्षण उपसंचालकांनी एका नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
पुणे : अकरावी प्रवेशाबाबत ‘आॅनलाइनपासून मुक्तता’ अशी विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करणारी जाहिरातबाजी केल्याबद्दल शिक्षण उपसंचालकांनी एका नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हे महाविद्यालय पुणे महापालिकेच्या हद्दीत नसल्याने आॅनलाइन प्रक्रियेत सहभागी नाही. मात्र या महाविद्यालयाला अकरावी प्रवेशासाठी अद्याप मान्यता दिलेली नसल्याने ही जाहिरात करणे योग्य नसल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. हद्दीबाहेरील प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जात नाही. संंबंधित महाविद्यालयस्तरावरच प्रवेश दिले जातात.
हवेली तालुक्यातील नऱ्हे येथील शार्दुल सुधाकरराव जाधवर वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाला नुकतीच मान्यता मिळालेली आहे. या महाविद्यालयाला शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अद्याप परवानगीपत्र दिलेले नाही. त्यामुळे अकरावी प्रवेश करता येत नाहीत. मात्र महाविद्यालयाने काही दिवसांपूर्वी ‘आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेपासून मुक्तता. अकरावी व बारावीत थेट प्रवेश’ अशी पत्रके शहरातील काही भागांत वाटली होती.
या पत्रकांबाबतची तक्रार शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे आली होती. त्यानुसार शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी २६ जून रोजी महाविद्यालयाला शासनाची व पालकांची दिशाभूल करणारी जाहिरात दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली.
अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे काम सुरू असताना अशी दिशाभूल करणारी जाहिरात करणे तसेच परवानगीपत्र दिलेले नसताना प्रवेशाची जाहिरात करणे योग्य नाही. याबाबत महाराष्ट्र खासगी शाळा अधिनियम १९८१ नुसार कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा समक्ष हजर राहून करावा; अन्यथा कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
>महाविद्यालयाचा माफीनामा
शिक्षण उपसंचालकांनी नोटीस बजावल्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याबाबत लेखी खुलासा केला असून झालेल्या प्रकाराबद्दल क्षमा करावी, असे त्यात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी ही जाहिरात देण्यात आली होती. या महाविद्यालयाला ग्रामीण भागात परवानगी मिळाल्याने आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया लागू नाही. त्यामुळे पालकांची दिशाभूल करण्याचा कोणताही उद्देश नाही. प्रवेश अद्याप सुरू केलेले नाहीत. परवानगीपत्रानंतरच प्रवेश दिले जातील, असा खुलासा महाविद्यालयातर्फे करण्यात आला आहे.
आॅफलाइन प्रवेशाबाबत जाहिरात करण्यात आल्याची तक्रार मिळाली होती. त्यानुसार माहिती घेतली असता अद्याप महाविद्यालयाला परवानगीपत्र दिले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आॅनलाइन प्रक्रिया सुरू असताना आॅफलाइनची जाहिरात करणे योग्य नाही. याबाबत महाविद्यालयाकडून खुलासा देण्यात आला आहे.- मीनाक्षी राऊत
सहायक शिक्षण संचालक