राज्यात वीज कोसळून अकरा ठार; सात जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 02:40 AM2019-10-31T02:40:53+5:302019-10-31T02:41:03+5:30
यामध्ये गणेश मोकळकार, गजानन अढाऊ व लक्ष्मी अढाऊ या तिघांचा मृत्यू झाला.
अमरावती/यवतमाळ/अकोला/औरंगाबाद : राज्यात मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा जोर वाढला असून बुधवारी वीज कोसळून अकरा जण ठार झाले तर सात जखमी झाले. अकोला जिल्ह्यात वीज कोसळून चार ठार झाले. तेल्हारा तालुक्यातील वरुड बु. येथे वीज कोसळून तीन जण ठार झाले तर अकोट तालुक्यातील बेलुरा येथे एक जण दगावला. या घटनांमध्ये अन्य तीन जण जखमी झाले आहेत. तेल्हारा तालुक्यातील वरुड येथे शेतातच वीज कोसळली.
यामध्ये गणेश मोकळकार, गजानन अढाऊ व लक्ष्मी अढाऊ या तिघांचा मृत्यू झाला. नागोराव अढाऊ व वैष्णवी अढाऊ हे गंभीर जखमी झाले. अकोट तालुक्यातील लाडेगाव शेतशिवारात काम करत असताना वीज कोसळल्याने दादाराव पळसपगार यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनिल पचांग हे गंभीर जखमी झाले. अमरावती जिल्ह्याच्या पूर्णानगर ते मार्की फाटा मार्गावरील एका झाडाखाली काहीजण आश्रयाला थांबले होते. त्या झाडावरच वीज कोसळल्याने सैयद नुरुद्दीन सैयद बद्रोद्दीन (६५), सोनाली बोबडे (३४) व शोभा गाठे (४५) या तिघांचा
जागीच मृत्यू झाला.
तर यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथे वीज कोसळून गजानन बळीराम पिंपळे (२८) असे या तरुणाचा मृत्यु झाला.
बुधवारी दुपारी अचानक पाऊस सुरू झाला. यावेळी विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. त्यामुळे गजानन आश्रयास झाडाखालील मळ्यावर थांबला होता. याच झाडावर वीज कोसळल्याने गजाननचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. माळबोरगाव येथील मधुकरराव मोरे (४०) व प्रभाकर मोरे (४४) हे दोघे भाऊ गावालगतच्या शेतात असताना तेवढ्यात वीज कोसळली़ यात मधुकरराव मोरे हे जागीच ठार झाले़ तर प्रभाकर मोरे हे जखमी झाले आहेत़