बीडमध्ये दुष्काळामुळे अकरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू
By Admin | Published: April 20, 2016 11:44 AM2016-04-20T11:44:12+5:302016-04-20T12:23:45+5:30
दिवसभर उन्हात पाणी भरल्यामुळे उष्माघाताने योगिता देसाईचा मृत्यू झाला आहे
>ऑनलाइन लोकमत -
बीड, दि. २० - दुष्काळात मराठवाडा होरपळत असताना बीडमध्ये अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. दिवसभर उन्हात पाणी भरल्यामुळे उष्माघाताने योगिता देसाईचा मृत्यू झाला आहे. योगिता देसाई भर उन्हात हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली होती त्यावेळीच तिला चक्कर आली आणि मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील साबलखेडा गावात ही घटना घडली आहे.
डोक्यावर सुर्य तळपत असताना योगिता देसाई गावापासून 500 किमी अंतरावर असलेल्या हातपंपावर पाणी भरण्यासाठी गेली होती. तिने पाच फे-या मारल्या होत्या. योगिता गेले काही दिवस आजारी होती. पण तरीही ती पाणी भरण्यासाठी गेली होती. पाचव्या फेरीला तिला चक्कर आली आणि खाली कोसळली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले, मात्र तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार हार्ट अॅटॅक आणि शरिरातील पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे बीडदेखील सलग तिस-या वर्षी दुष्काळाचा सामना करत आहे. रविवारी बीडमधील तापमान 42 डिग्रीवर पोहोचले होते. देशभरात उष्मघातामुळे 110 लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात ओडीसामध्ये 45 तर तेलंगणामध्ये 35 लोकांचा मृत्यू झाला आहे.