अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार!

By admin | Published: June 6, 2017 01:26 AM2017-06-06T01:26:12+5:302017-06-06T01:26:12+5:30

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया : शिक्षण विभागाने सोमवारी पाठविला प्रस्ताव

Eleventh to enter the process! | अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार!

अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडणार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: येत्या शैक्षणिक वर्षामध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला होता; परंतु यंदा केंद्रीय प्रवेशाचा मार्ग खडतर असल्याचे दिसून येत आहे. पुणे येथील शिक्षण संचालकांनी शहरातील कनिष्ठ महविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश राबविण्याबाबत अद्याप परवानगी दिली नाही. दहावीचा निकाल तोंडावर असताना, माध्यमिक शिक्षण विभागाने केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी शिक्षण संचालकांकडे पाठविला. त्यामुळे यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीचे प्रवेश होणार नसल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे.
अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा अकोला शहरातसुद्धा राबविण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षण विभागाने घेतला होता. त्या दृष्टिकोनातून माध्यमिक शिक्षण विभागाकडून कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थी संख्या, महाविद्यालयाचे नाव, पत्ता आणि पदसंख्या याची माहिती मागविली होती. ग्रामीण भागासह परजिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शहरात शिक्षणासाठी येतात. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. ही बाब लक्षात घेता, शिक्षण विभागाने अकोल्यातसुद्धा आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता; परंतु शिक्षण संचालकांनी केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश राबविण्यास परवानगी दिली नाही. दहावीचा निकाल जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. असे असतानाही शिक्षण विभागाला केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात परवानगी न मिळाल्यामुळे यंदा अकरावीचे प्रवेश दरवर्षीप्रमाणेच होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने सोमवारी केंद्रीय पद्धतीने प्रवेश राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविला; परंतु प्रस्तावाला शिक्षण संचालकांनी परवानगी दिली नाही तर प्रवेश रखडतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

तर कनिष्ठ महाविद्यालयांना फायदा
शिक्षण संचालकांनी अकोला शहरातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्याची परवानगी दिली नाही तर त्याचा फायदा कनिष्ठ महाविद्यालय आणि शहरातील काही शिकवणी वर्ग संचालकांना होणार आहे. केंद्रीय पद्धतीला आधीपासून कनिष्ठ महाविद्यालयांनी विरोध दर्शविला होता. केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया नसल्यास, कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जांची विक्री करून आणि मनमानी पद्धतीने डोनेशन उकळून प्रवेश प्रक्रिया राबवतील.

विद्यार्थी संघटना आक्रमक
शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्यासंदर्भात अभाविप, एनएसयूआय या विद्यार्थी संघटना आग्रही होत्या. त्यासाठी या विद्यार्थी संघटनांनी आंदोलनसुद्धा केले; परंतु शहरात यंदा केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार नसल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

केंद्रीय पद्धतीनुसार अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासंदर्भात परवानगीचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात आला. त्यासाठी शिक्षण संचालकांच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.
- आत्माराम राठोड,
सहायक शिक्षण उपनिरीक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग

Web Title: Eleventh to enter the process!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.