अकरावी प्रवेशाचा खेळखंडोबा

By admin | Published: August 24, 2016 01:43 AM2016-08-24T01:43:25+5:302016-08-24T01:43:25+5:30

अकरावीला घरापासून नजीकच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालकही हट्टाला पेटले आहेत.

Eleventh entrance clash | अकरावी प्रवेशाचा खेळखंडोबा

अकरावी प्रवेशाचा खेळखंडोबा

Next


मुंबई : अकरावीला घरापासून नजीकच्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालकही हट्टाला पेटले आहेत. त्यामुळेच अकरावीच्या पहिल्या टप्प्यातील आॅनलाइन प्रवेशानंतर महाविद्यालय बदलासाठी सलग दोन विशेष फेऱ्यांसाठी २५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. मात्र या सर्व प्रक्रियांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत प्राचार्य आणि शिक्षणतज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.
यंदा प्रथमच अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. कारण उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अकरावीचे १०० टक्के प्रवेश हे आॅनलाइन पद्धतीनेच करावे लागणार आहेत. मात्र एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, म्हणून प्रशासनाने दोन महिन्यांपासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे. शिक्षण व्यवस्थेतील एका महत्त्वाच्या बदलाला सकारात्मकतेने घेण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा बाऊ करून पालक या प्रक्रियेविरोधात उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. उलट आॅफलाइनच्या निमित्ताने होणाऱ्या भ्रष्टाचाराला चाप लावत पारदर्शक प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला शिक्षणतज्ज्ञांनीही पसंती दर्शवली आहे.
प्रवेश बदलाच्या खेळात पालकही सामील होत असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी हजारो रुपये खर्चून आॅफलाइन प्रवेशाची मागणीही काही पालकांनी केली आहे. मात्र हाच भ्रष्टाचार रोखून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेशाची समान संधी देण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)
> अजूनही महाविद्यालयांबाहेर बेटरमेंटसाठी विद्यार्थी आणि पालकांच्या रांगा लागत आहेत. महाविद्यालय निवडीचा हट्ट धरताना प्रवेशासाठी किती वेळ वाया जात आहे, याचा विचार पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा.
- टी.पी. घुले, प्राचार्य, महर्षी दयानंद महाविद्यालय

Web Title: Eleventh entrance clash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.