अकरावी प्रवेशप्रक्रियेत गोंधळ?
By admin | Published: May 19, 2016 02:11 AM2016-05-19T02:11:27+5:302016-05-19T02:11:27+5:30
अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली असली, तरी इन हाऊस कोट्यातील प्रवेशासंदर्भात गोंधळ कायम
पिंपरी : अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली असली, तरी इन हाऊस कोट्यातील प्रवेशासंदर्भात गोंधळ कायम आहे. इन हाऊस कोट्यातील २ हजार ६४८ जागांवरील प्रवेश कोणत्या पद्धतीने करावेत, याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाने मार्गदर्शन करावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावर शासनाकडून कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याने इन हाऊस कोट्यातील प्रवेशात गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या जागांसाठी राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेच्या नियोजनाची माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. या वेळी सहाय्यक शिक्षण संचालक व प्रवेश समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत उपस्थित होत्या.
राज्य शासनातर्फे अकरावी प्रवेशाच्या इन हाऊस कोट्याच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. एखाद्या शिक्षण संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालय असेल तर त्याच संस्थेला जोडून असणाऱ्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना इन हाऊस कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे. त्यामध्ये कला शाखेच्या मराठीच्या ३२८, इंग्रजीच्या १८0 तर वाणिज्य शाखेच्या इंग्रजीच्या ७५६ तर मराठीच्या ३0४ जागा आहेत. विज्ञान शाखेच्या १,०८० जागा असून एकूण जागा २,६४८ जागा आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना दोन वेळा बेटरमेंटची संधी देण्यात आली होती. मात्र,विद्यार्थ्यांना २0१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून बेटरमेंटची संधी एकदाच मिळणार आहे. विद्यार्थ्यांना सवर्साधारण ३0 आणि घराजवळच्या २0 महाविद्यालयांची निवड करावी लागेल. मागील वर्षी झोननिहाय पसंतीक्रम भरण्याची पद्धत बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना घरापासून फार दूरचे महाविद्यालय मिळाले होते. त्यामुळेच पहिल्या वर्षी सुरू असलेली झोननिहाय पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
शिक्षण विभागातर्फे ९ झोन जाहीर केले आहेत. त्यात पुणे मध्यवर्ती शहर, कोथरूड-कर्वेनगर, पर्वती -धनकवडी - स्वारगेट परिसर, सिंहगड रस्ता परिसर, कॅम्प - येरवडा, हडपसर, शिवाजीनगर-औंध-पाषाण, भोसरी- चिंचवड व निगडी विभाग यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
>व्यवस्थापन, अल्पसंख्यांक तसेच इनहाऊस कोट्यातील प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारचा स्वतंत्र प्रवेश अर्ज विकसित अथवा विक्री करू नये. त्याचप्रमाणे हे प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी कोट्यातील प्रवेशासाठीचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध करून द्यावेत. विद्यार्थी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरतील किंवा आॅनलाईन अर्ज डाऊनलोड करून भरू शकतील, याबाबत कनिष्ठ महाविद्यालयाने काळजी घ्यावी.
महाविद्यालयांनी शाखा, माध्यम व कॉलेज कोडनिहाय कोट्यातील प्रवेशाचे अर्ज स्वीकारावेत. अर्ज स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांना पोहोच द्यावी. त्याच प्रमाणे महाविद्यालयाच्या नोंदवहीत नोंद ठेवून अर्ज देणाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी. तसेच वेळापत्रकामध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्येच अर्ज स्वीकारावेत. प्राप्त अर्जांची कोटानिहाय व कॉलेज कोडनिहाय नोंद सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून सूचनाफलकावर तसेच माहाविद्यालयाच्या संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकानुसार जाहीर करावी.
मागील वर्षी अकरावीच्या विद्यार्थ्यांना दोन वेळा बेटरमेंटची संधी देण्यात आली होती. यंदा विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलाची एकच संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी पहिल्या यादीनुसार प्रवेश घेतल्यानंतर त्यांना दुस-या यादीत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर त्यास प्रवेश बदलण्याची संधी असेल. मात्र, एका पेक्षा अधिक वेळा महाविद्यालय बदलता येणार नाही.
पहिली गुणवत्ता यादी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित कोट्याच्या क्षमतेइतकी प्रसिद्ध करावी. प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाने कोट्यांतर्गत गोषवारा विहित नमुन्यात तयार करून पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताच शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या ई-मेलवर सेंड करावी. कोट्यातील पहिल्या प्रवेश फेरीनंतर केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.