अकरावी प्रवेशप्रक्रिया मेअखेरीस
By Admin | Published: April 5, 2017 01:31 AM2017-04-05T01:31:39+5:302017-04-05T01:31:39+5:30
इयत्ता दहावीची परीक्षा संपल्याने आता विद्यार्थी व पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत
पिंपरी : इयत्ता दहावीची परीक्षा संपल्याने आता विद्यार्थी व पालकांना अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र, त्यासाठी किमान दीड महिना वाट पाहावी लागणार आहे. या वर्षी विद्यार्थ्यांना मे महिन्यांच्या अखेरीस आॅनलाईन प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. असे असले, तरी पुढील प्रक्रियेला विलंब होणार नाही, याची दक्षता केंद्रीय प्रवेश समितीकडून घेतली जाणार आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने आॅनलाईन राबविले जाते. केंद्रीय प्रवेश समितीमार्फत ही प्रक्रिया पार पाडली जाते. विद्यार्थ्यांना भाग १ व भाग २ अशा दोन टप्प्यांत आॅनलाईन प्रवेश अर्ज भरावे लागतात. ही प्रक्रिया सुटसुटीत व्हावी, यासाठी दहावीच्या निकालापूर्वीच अर्जाचा भाग एक भरून घेतला जात होता. ही प्रक्रिया एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला सुरू केली जात होती. यंदा मात्र त्यामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग आता मे महिन्याच्या अखेरीस भरता येईल. त्यामुळे अजून दीड महिना वाट पाहावी लाणार आहे.
याविषयी सहायक शिक्षण उपसंचालक व अकरावी समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत म्हणाल्या, ‘‘यंदा प्रवेशासाठी नवी एजन्सी नेमण्यात आल्याने कनिष्ठ महाविद्यालयांच्या नोंदणीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. माहितीपुस्तिकांच्या छपाईचे काम सुरू आहे. अर्ज भरण्यास लवकर सुरुवात केली तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद सुरुवातीला मिळत नाही. शेवटच्या काळातच अधिक गर्दी होते. तसेच या काळात शिक्षण विभाग व कनिष्ठ महाविद्यालयांतील कर्मचारी या कामात विनाकारण अडकून पडतात.’’
त्यामुळे या वर्षी समितीने ही प्रक्रिया उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आॅनलाईन अर्ज महाविद्यालांमध्येच भरणे बंधनकारक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना फारशी अडचण येणार नाही.