अकरावीची शेवटची यादी जाहीर
By admin | Published: September 29, 2016 04:00 AM2016-09-29T04:00:56+5:302016-09-29T04:00:56+5:30
गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळणार आहे. बुधवारी अकरावी प्रवेशाची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी
मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळणार आहे. बुधवारी अकरावी प्रवेशाची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आहे. दरम्यान, महाविद्यालयांनी केलेल्या खोडसाळपणामुळे ११ गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
पहिल्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपासून फेरपरीक्षेतील उत्तीर्ण आणि एटीकेटी लागलेल्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रवेशाच्या एकूण अकरा फेऱ्या घेतल्या. मात्र तरीही शेकडो विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशाबाबात नाराजी व्यक्त होत आहे. आॅफलाइन प्रवेशासाठी लाखो रुपये उकळणाऱ्या महाविद्यालय आणि दलालांना १०० टक्के आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे चाप लागला. परिणामी विद्यार्थ्यांना नाहक त्रास देण्याचे काम काही महाविद्यालयांनी केले आहे. यामध्ये रिक्त जागा दाखवत विद्यार्थी आणि पालकांना उपसंचालक कार्यालयातून पत्र आणण्याचा चुकीचा सल्ला बहुतांश महाविद्यालयांनी दिला. त्यामुळे उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. विद्यार्थी, पालक आणि अधिकाऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे आॅफलाइन प्रवेश सुरू होतील, हे महाविद्यालयांच्या खोडसाळपणामागील मुख्य कारण होते. (प्रतिनिधी)
कारवाई कराच... : आॅनलाइन प्रक्रियेबाबत मुंबई महानगर क्षेत्रातील बहुतेक महाविद्यालय आणि प्राचार्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालयाकडे पाठवण्याचे काम केले. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेशापासूनच वंचित राहावे लागले. आपली जबाबदारी झटकून चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्यांवर उपसंचालक कार्यालयाने कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार विद्यार्थी व पालकांनी केली आहे.