अकरावी आॅनलाइन प्रवेशाला ‘लेटमार्क’
By admin | Published: May 24, 2017 03:15 AM2017-05-24T03:15:46+5:302017-05-24T03:15:46+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली नसल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला सुरुवातीलाच ‘लेटमार्क’ लागला आहे. मे महिन्याच्या अखेरीस आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली नसल्याने यंदा प्रवेश प्रक्रियेला सुरुवातीलाच ‘लेटमार्क’ लागला आहे. मे महिन्याच्या अखेरीस आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे अर्ज भरायचे असतात. पहिल्या टप्प्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याआधी विद्यार्थी नावनोंदणी करून प्राथमिक माहिती भरतात. त्यानंतर निकाल लागल्यावर अन्य बाबी भरल्या जातात. एक अर्ज भरून झाल्यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होतो. पण, यंदा विद्यार्थ्यांवर ताण येणार असल्याचे चित्र आहे.
आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचे कंत्राट नवीन कंपनीकडे दिले आहे. यंदाच्या प्रक्रियेत अनेक बदल आहेत. पण, अजूनही अर्ज व माहिती पुस्तिका छापून झाल्या नाहीत. हे काम या आठवड्यात पूर्ण होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
अकरावीसाठी एकूण २ लाख ९२ हजार ९० जागा उपब्लध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ हजारांहून अधिक जागा वाढल्या आहेत. या उपलब्ध जागांपैकी आॅनलाइनसाठी १ लाख ५९ हजार ६८२ जागा उपलब्ध असणार आहेत