अकरावी आॅनलाइन अर्ज २९ जूनपर्यंत भरता येणार
By admin | Published: June 28, 2017 02:05 AM2017-06-28T02:05:43+5:302017-06-28T02:05:43+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपला असे चित्र असतानाच शेवटच्या दिवशीही हा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अनेक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपला असे चित्र असतानाच शेवटच्या दिवशीही हा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अनेक विद्यार्थ्यांना गुण दिसत नव्हते तसेच अर्ज भरताना अन्य अडचणी येत होत्या. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरून न झाल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातला फोन सतत खणखणत होता. त्यामुळे अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवलेली असून २९ जूनला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी नि:श्वास सोडला.
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. १३ जून रोजी आॅनलाइनवर दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर १६ जून रोजी विद्यार्थ्यांनी अर्ज दोन भरण्यास सुरुवात केली. विद्यार्थी दुसरा अर्ज भरत असताना अनेक अडचणी येत होत्या. तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकही त्रस्त झाले होते. त्यामुळे संकेतस्थळातील त्रुटी काढून टाकण्यासाठी नवीन कंपनीला एक दिवस देण्यात आला.
या कंपनीने एका दिवसात त्रुटी दुरुस्त केल्याचा दावा केला. शिक्षण उपसंचालक विभागानेही त्रुटी दूर झाल्याचे स्पष्ट केले. परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सतत विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या म्हणूनच पालकांनी तेथे हजेरी लावली होती. अनेक विद्यार्थ्यांचे वाढीव गुण शेवटच्या दिवशीही संकेतस्थळावर दिसत नव्हते. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची वाढ देण्यात आल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.