१६ आॅगस्टपासून अकरावीची दुसरी विशेष फेरी
By admin | Published: August 12, 2016 07:55 PM2016-08-12T19:55:35+5:302016-08-12T19:55:35+5:30
अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिल्या यादीत सामील झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - अकरावीच्या दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून पहिल्या यादीत सामील झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. नवे लॉगीन आयडी आणि पासवर्ड घेण्यासाठी १६ आॅगस्टला सुरूवात होणार असल्याचे उपसंचालक कार्यालयाने सांगितले. तरी पहिल्या विशेष फेरीत अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना नवीन लॉगीन आयडी आणि पासवर्ड घेण्याची गरज नसल्याचे शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाले की, पहिल्या विशेष फेरीअखेर अर्ज केलेल्या ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांपैकी एकूण ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना महाविद्यालय बदलाची संधी मिळाली आहे. मात्र या विशेष फेरीदरम्यान ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांसह ज्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीतही आवडते महाविद्यालय
मिळालेले नाही, त्यांना दुसऱ्या फेरीत संधी मिळणार आहे. मात्र नव्याने अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी तेथील रिक्त जागांची माहिती घेण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
याआधी पहिल्या विशेष फेरीत एकूण ३१ हजार ०४० विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरले होते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सामील होता आले नाही. तरी या विद्यार्थ्यांना दुसऱ्या विशेष फेरीत अर्ज करण्यासाठी नव्याने लॉगीन आयडी घेण्याची गरज नाही. जुन्याच लॉगीन आयडीवर अर्ज पूर्ण भरता येईल. मात्र प्रवेश अर्ज केल्यानंतर पसंतीक्रम अर्ज (आॅप्शन फॉर्म)
भरताना विद्यार्थ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण पहिल्या विशेष फेरीनंतर रिक्त जागांचा आकड्यात बदल झालेला असेल. त्यामुळे अर्धवट अर्ज पूर्ण करताना विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्जात योग्य बदल करण्याची
गरज आहे.
.........................
दुसऱ्या फेरीतील अर्जांची संख्या वाढणार
पहिल्या विशेष फेरीदरम्यान ३१ हजार ०४० विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरले होते. तर गुणवत्ता यादीत ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना एकही महाविद्यालय मिळालेले नाही. तर महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांत केवळ ४० हजार ३२६ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. याउलट उरलेल्या १९ हजार ६३४ विद्यार्थ्यांना चौथ्या आणि त्यानंतरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी दुसऱ्या विशेष फेरीत महाविद्यालय बदलासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दुसऱ्या विशेष फेरीसाठी सुमारे ५० हजारांहून अधिक
अर्ज येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
............................
दुसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक
१६ ते १९ आॅगस्ट -
मार्गदर्शन केंद्रावर नवीन लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करता येईल.
(मार्गदर्शन केंद्रांचे पत्ते मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत.)
१९ व २० आॅगस्ट (रात्री ११.५८ वाजेपर्यंत)
नवीन आॅनलाईन अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरता येईल.
२३ आॅगस्ट -
दुसरी विशेष गुणवत्ता यादी सायंकाळी ५ वाजता जाहीर होईल.
२४ आणि २५ आॅगस्ट -
दुसऱ्या विशेष गुणवत्ता यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना सकाळी
१० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान संबंधित महाविद्यालयात शुल्क भरून प्रवेश
निश्चित करता येईल.
..........................
विद्यार्थ्यांनो हे लक्षात ठेवा...
विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम अर्ज भरताना संबंधित महाविद्यालयांतील रिक्त
जागांची माहिती घेऊन पसंतीक्रम द्यावा.
पहिल्यांदाच अर्ज करणाऱ्या आणि आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छीणाऱ्या
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रावर जाऊन प्रवेश अर्ज भरावा लागेल.
त्याशिवाय त्यांना पसंतीक्रम अर्ज भरता येणार नाही.
पसंतीक्रम अर्जात किमान १० आणि कमाल १५ कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती
देणे बंधनकारक आहे.