अकरावीची दुसरी विशेष फेरी आजपासून
By Admin | Published: August 16, 2016 01:44 AM2016-08-16T01:44:58+5:302016-08-16T01:44:58+5:30
अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीमध्ये ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या विशेष फेरीला सुरुवात होत आहे. सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी
मुंबई : अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीमध्ये ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या विशेष फेरीला सुरुवात होत आहे. सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशबदल करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.
पहिल्या विशेष फेरीसाठी ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश देण्यात आला, तर ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नव्हता. मात्र प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केला, तर १५ हजार २३२ विद्यार्थ्यांनी प्रशासनाने दिलेला पर्याय नाकारला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थी पुन्हा प्रवेश अर्ज करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या फेरीत अर्ज करणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले, तर २६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत.
मंगळवारी, १६ आॅगस्टला दुसरी विशेष फेरी सुरू होत असून, पुन्हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड देण्यास सुरुवात होईल. पहिल्या फेरीत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी नव्याने लॉग इन आयडी व पासवर्ड घ्यावा लागेल. अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना नवा आयडी आणि पासवर्ड घेण्याची गरज नाही. आधी अर्धवट राहिलेला प्रवेश अर्ज नव्याने भरून पसंतीक्रम अर्ज भरावा लागेल.
१६ ते १९ आॅगस्ट
मार्गदर्शन केंद्रांवर नवीन लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करता येईल. (मार्गदर्शन केंद्रांचे पत्ते मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत.)
१९ व २० आॅगस्ट
(रात्री ११.५८ वाजेपर्यंत)
नवीन आॅनलाइन अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरता येईल.
२३ आॅगस्ट
दुसरी विशेष गुणवत्ता यादी सायंकाळी ५ वाजता जाहीर होईल.
२४ आणि २५ आॅगस्ट
दुसऱ्या विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान संबंधित महाविद्यालयांत शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येईल.