अकरावीची विशेष गुणवत्ता यादी उशिरा जाहीर होणार
By admin | Published: August 11, 2016 05:42 PM2016-08-11T17:42:35+5:302016-08-11T17:42:35+5:30
अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणा-या विशेष आॅनलाईन फेरीतील पहिली गुणवत्ता यादी गुरूवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती. मात्र काही तांत्रिक कारणास्तव
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणा-या विशेष आॅनलाईन फेरीतील पहिली गुणवत्ता यादी गुरूवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती. मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही यादी रात्री ८ वाजल्यानंतर जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांना मात्र याची कल्पना नसल्याने सायंकाळी यादी तपासणा-या हजारो विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
पहिल्या आॅनलाईन प्रक्रियेत दूरचे महाविद्यालय मिळाल्याने महाविद्यालय बदल करू इच्छीणा-या विद्यार्थ्यांनी या फेरीसाठी मोठ्या संख्येने अर्ज केलेले आहेत. याशिवाय शाखा आणि विषय बदल करू इच्छीणा-या विद्यार्थ्यांनी या फेरीसाठी अर्ज केले आहेत. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत या फेरीसाठी एकूण ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विशेष यादीत नाव जाहीर होणा-या विद्यार्थ्यांना शुक्रवार व शनिवारी संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. मात्र सायंकाळी उशिराने यादी जाहीर होणार असल्याचे कळताच विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
गुणवत्ता यादी पाहण्यासाठी घरात संगणक नसल्याने सायबर कॅफेमध्ये जावे लागते. मात्र रात्री आठ वाजल्यानंतर यादी जाहीर होणार असल्याचे कळाले.
त्यामुळे घरातून रात्री उशिराने बाहेर जावे लागणार आहे. घरापासून सायबर कॅफे दूर असल्याने पालकांना सोबत घेऊन जावे लागेल. शुक्रवारी आणि शनिवारी प्रवेश निश्चित करायचा असल्याने आजच यादी पाहणे जरूरी आहे. किमान विद्यार्थिनींचा विचार प्रशासनाने करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.