अकरावीसाठी यंदा २ लाख ९२ हजार जागा
By admin | Published: May 18, 2017 03:04 AM2017-05-18T03:04:37+5:302017-05-18T03:04:37+5:30
अकरावी प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना सरळ, सुलभ व्हावी, म्हणून नवीन प्रक्रिया पद्धती लागू करण्यात आली आहे, पण या पद्धतीमुळे यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया उशिरा
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना सरळ, सुलभ व्हावी, म्हणून नवीन प्रक्रिया पद्धती लागू करण्यात आली आहे, पण या पद्धतीमुळे यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीसाठी यंदा २ लाख ९२ हजार जागा असून, यापैकी १ लाख ५९ हजार जागा आॅनलाइन भरण्यात येणार असून, प्रवेश प्रक्रिया २५ मे नंतर सुरू होणार आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीसाठीच्या एकूण १३ हजार ८०८ जागा वाढल्या आहेत. शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रात यंदा अकरावीसाठी एकूण २ लाख ९२ हजार ९० जागा उपब्लध आहेत. त्यात कला शाखेसाठी ३४ हजार १८०, वाणिज्य शाखेसाठी १ लाख ६० हजार ८७०, विज्ञान शाखेसाठी ९१ हजार १० जागा आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ हजारांहून अधिक जागा वाढल्या आहेत.
एकूण उपलब्ध जागांपैकी आॅनलाइनसाठी १ लाख ५९ हजार ६८२ जागा उपलब्ध असणार आहेत. यात कला शाखेसाठी १९ हजार ९२४, वाणिज्य शाखेसाठी ८५ हजार १६३, विज्ञान शाखेसाठी ५० हजार ८४९ आणि एमसीव्हीसाठी ३ हजार ७४६ जागा उपलब्ध असतील, असे जाहीर करण्यात आले आहे.
यंदा पुरेशा जागा
गेल्या वर्षी आॅनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थी, पालक त्रस्त झाले होते. ही प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी, आॅनलाइन पद्धत पूर्णपणे नव्याने राबविण्यात आली आहे. यासाठी एका नवीन कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या पद्धतीने उपलब्ध असणाऱ्या जागा बुधवारी जाहीर करण्यात आल्या. या वेळी अकरावीसाठी पुरेशा जागा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.