४५ हजार डॉक्टरांचा राज्य सरकारविरोधात 'एल्गार'; १४ दिवस होणार 'सेल्फ क्वारंटाईन'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 11:21 AM2020-09-09T11:21:44+5:302020-09-09T11:57:59+5:30
राज्याच्या ४५००० डॉक्टरांकडून ७ सप्टेंबर पासून राज्यात सर्वत्र संघर्षाचा पवित्रा घेत विविध मार्गाने लढा दिला जाणार आहे..
पुणे : कोरोनाची महामारी सुरु झाल्यापासून महाराष्ट्र सरकारने आणि आरोग्य सचिवांपासून सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी 'आयएमए'च्या आणि इतर सर्व खाजगी डॉक्टरांवर सतत अन्याय केला आहे. परंतु, आता महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे स्वत:ला 'सेल्फ क्वारंटाइन' करून घेतले आहे, त्याप्रमाणे डॉक्टरसुध्दा सामुदायिकरित्या ‘सेल्फ क्वारंटाइन’ करून घेणार आहे. या विलगीकरणाची मुदत १४ दिवसांपर्यंत असू शकेल.तसेच महाराष्ट्रातील' इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या सर्व शाखा १० सप्टेंबर रोजी सकाळी आपापल्या शाखेसमोर किंवा एखाद्या प्रमुख ठिकाणी सकाळी ११ वाजता एकत्र जमून आपल्या मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशनच्या प्रतिकृतींची होळी करणार आहे.
शासनाच्या या निर्णयाविरुध्द 'इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या राज्याच्या २१६ शाखांमधील ४५००० डॉक्टरांकडून सोमवार, ७ सप्टेंबर पासून राज्यात सर्वत्र संघर्षाचा पवित्रा घेत विविध मार्गाने लढा दिला जाणार आहे. आयएमएतर्फे मुंबई हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात येणार आहे. रुग्णालयाचे दर एकतर्फी ठरवून डॉक्टरांच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे.
१० सप्टेंबरपासून आठवड्याभरात आयएमएच्या सर्व शाखा त्यांच्या विभागातील प्रशासकीय अधिका-यांच्या कार्यालयासमोर शांततामय निदर्शने करून निवेदन देतील.डॉक्टरांवरील दडपशाहीबद्दल सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना सविस्तर निवेदने दिली जाणार आहेत. मुंबईत आझाद मैदान येथे डॉक्टरांची महारॅली आयोजित करून शांततामय निदर्शने करण्यात येतील आणि मंत्री मंडळात तसेच विधीमंडळात लक्षवेधी सूचना मांडण्याचा प्रस्ताव देण्यात येईल.
कोव्हिड रुग्णाच्या उपचारात मृत्युमुखी पडलेल्या सहकारी शहीद डॉक्टरांच्या स्मरणार्थ ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सर्व डॉक्टर्स आपापल्या दवाखान्यांसमोर एकत्रित होऊन १० मिनिटे मूक श्रद्धांजली वाहतील. त्याच दिवशी रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील प्रत्येक आयएमए शाखेच्या ऑफिससमोर अथवा गावातील प्रमुख ठिकाणी शहीद डॉक्टरांचे प्रातिनिधिक पोस्टर लावतील आणि त्याच्या खाली प्रत्येक आयएमए सदस्य एक पणती किंवा मेणबत्ती लावून त्यांना श्रद्धांजली वाहील.