गोपीचंद पडळकरांचा पुन्हा एल्गार; धनगर आरक्षणासाठी जागर यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 02:42 PM2023-10-06T14:42:10+5:302023-10-06T14:42:26+5:30
मी पहिले धनगर...मग आम.गोपीचंद पडळकर ; आरक्षणाचा हक्क न्यायालयीन मार्गाने मिळवण्याचा निर्धार ; संपुर्ण महाराष्टात धनगर जागर यात्रा
आटपाडी - मी पहिला धनगर असून नंतर गोपीचंद पडळकर असल्याचे सांगत धनगर आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र भर दौरे केला जाणार असल्याचा निर्धार आमदार पडळकर यांनी व्यक्त केला आहे. 12 ते 17 ऑक्टोबर असा पहिला टप्पा करणार आहेत.
धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागील पाच वर्षांपूर्वी धनगर जागर यात्रा आयोजित केली होती.या जागर यात्रेतून त्यांनी महाराष्ट्र राज्यातील समस्थ धनगर समाजाला जागृत करण्याचे काम केले होते.
त्यावेळी राज्य सरकारला केंद्र सरकारकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास भाग पाडले होते. सध्या महाराष्ट्र राज्यात विविध समाज आपल्या आरक्षणाच्या न्याय व हक्कासाठी धरणे, मोर्चे याद्वारे आक्रमकतेने भूमिका मांडत आहेत. यामध्ये धनगर समाजातील अनेक नेते व कार्यकर्ते विविध ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. यातच काही दिवसांपूर्वी आमदार पडळकर यांनी सरकारला इशारा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत समाजाच्या भावनांचा आदर करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती.अन्यथा समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो असा इशारा दिल्यानंतर सरकारने दोन महिन्याचा कालावधी मागून घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा जागर यात्रा सुरू केली असून त्यांचा पहिला टप्पा 12 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. यामध्ये 12 ऑक्टोबर मराठवाडा,13 ऑक्टोबर-उत्तर महाराष्ट्र, 14 ऑक्टोबर -विदर्भ, 16 ऑक्टोबर -पश्चिम महाराष्ट्र, 17 ऑक्टोबर-कोकण अशी धनगर जागर यात्रा होणार आहे. यावेळी पडळकर म्हणाले की, धनगर आरक्षणाचा हक्क आम्ही न्यायालयीन पातळीवर लढतच आहोत. तो लढा आम्ही जिंकून आमचा हक्क आम्ही मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही. यासाठीच संपूर्ण महाराष्ट्रात धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र करण्याचे काम सुरू आहे.त्याचा पहिला टप्पा सुरू करत आहोत.आणि ही लढाई सर्वांच्या साथीने निश्चित जिंकू असं त्यांनी म्हटलं.