आई मला तुझी फार काळजी वाटते... ; एल्गार प्रकरणातील आरोपींना जामीन देण्यासंबंधी विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:20 PM2020-03-31T12:20:13+5:302020-03-31T12:22:39+5:30
एल्गार प्रकरणातील आरोपींना जामीन द्यावा शोमा सेन यांच्या मुलगी कोयल सेन यांची सरकारला विनंती
युगंधर ताजणे-
पुणे : देशात कोरोनाच्या भीतीने सर्वजण घरात बसून आहेत. आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने कैद्यांना पॅरोल आणि जामिनावर सोडले आहे. माझी आई शोमा सेन हिच्यासह आणखी एल्गारशी संबंधित ज्या व्यक्ती तुरुंगात आहेत त्यांना शासनाने जामीन द्यावा. विशेषत: मला माझ्या आजारी आईची खूपच काळजी वाटते. आताची परिस्थिती लक्षात घेता त्यांना सोडावे. असे पत्र एल्गार प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांची मुलगी कोयल सेन यांनी राज्य शासनाला दिले आहे.
कोयल सेन यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर यासारख्या सोशल माध्यमातून देखील ही विनंती शासनाला केली आहे. एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणाची कागदपत्रे आणि सुनावणी मुंबई येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयात वर्ग करण्यास येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी यापुढे मुंबईत सुरू आहे. सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्वस्तरातून काळजी घेण्यात आली आहे. 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या कैद्यांना मुक्त करण्याचा आदेश नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याची अंमलबजावणी राज्यात तातडीने करण्यात आली असून त्यानुसार दररोज ठराविक संख्येने कैदी सोडण्यात येत आहे. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दंगलीमागे काही शहरी माओवादी व्यक्तींचा सहभाग आहे या कारणावरून अनेकांना अटक करण्यात आली. त्यात शोमा सेन यांचाही समावेश आहे. मात्र त्यांची तब्येत बरी नसून गेल्या इतर कैदीप्रमाणे त्यांना मुक्त करावे असे कोयल सेन यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, कोविड 19 याची लागण तुरुंगात देखील होण्याची भीती आहे. जास्त गदीर्मुळे नियंत्रणाबाहेरची परिस्थिती आणखीनच बिघडेल.
"देशभरातील तुरूंगांमध्ये अनेक कैदी आहेत, त्यांना अनेक वर्षे तुरुंगवास भोगावा लागत आहे. एल्गार प्रकरणात दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी.एन. साईबाबा, कवी वरवरा राव, प्रा. शोमा सेन, सुधा भारद्वाज, यांच्यासह अरुण फरेरा, व्हर्नन गोंसालविस, सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन यासह एकूण 11 जण एल्गार प्रकरणी दोषी असल्याच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. यातील अनेकजण जेष्ठ आहेत. त्यांच्या आरोग्याचा शासनाने विचार करावा. असे कोयल सेन यांनी म्हटले आहे. देशातील अनेक तुरूंगांमध्ये योग्य रूग्णालये, पुरेसे डॉक्टर किंवा उपचाराची सुविधा नाही. केंद्र व राज्य सरकारला विनंती आहे की, त्यांनी एल्गार प्रकरणातील कैद्यांसह इतरही सर्व राजकीय कैद्यांना जामीन किंवा पॅरोल देण्यासाठी तात्काळ पावले उचलावतीत.
* सर्व स्तरातून पाठिंबा, ४० हुन अधिक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचे समर्थन
ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय, प्रा. गिल्बर्ट आचर, प्रा. जैरस बानजी, प्रा. शकुंतला बानजी, सुजातो भद्रा, तरुण भारतीया, प्रा. कमल मित्र, बर्नार्ड द मिलो, एस के दास, विद्याधर दाते, ऋतुजा देशमुख, झेवीयर दास, हर्ष कपूर यासारख्या समाजातील विविध स्तरातील व्यक्तींनी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होऊन सर्व राजकीय कैद्यांना मुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. प्राध्यापक, विचारवंत, चित्रपट निर्माते, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकील क्षेत्रातील मान्यवरांनी याला आपले समर्थन दिले आहे.