बारामतीत मराठा क्रांतीचा एल्गार
By Admin | Published: September 30, 2016 02:21 AM2016-09-30T02:21:49+5:302016-09-30T02:21:49+5:30
कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्या, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमीभाव द्या आदी
बारामती : कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्या, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, शेतकऱ्यांच्या शेतीमाला हमीभाव द्या आदी मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा बारामतीत धडकला. या मोर्चाचे नेतृत्व महाविद्यालयीन युवतींनी तसेच महिलांनी केले. शहरात भगवामय वातावरणात ‘नि:शब्द हुंकार’ राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम लाखोच्या संख्येने आलेल्या मराठा बांधवांनी केले.
सकाळी १०.३० वाजता कसबा येथील शिवाजी उद्यानामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शीला भोंडवे, ऐश्वर्या गाडेकर, विशाखा काकडे, वर्षाराणी ढमे, ऋतुजा गुळूमकर या युवतींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी गीतांजली वाघ, श्रुती वाघ, ईश्वरी साळुंके यांनी राजमाता जिजाऊ यांना वंदन केले. सुरुवातीला महाविद्यालयीन युवती, त्यानंतर महिला व त्यांच्या मागे युवक आणि पुरुष मंडळी शिस्तबद्धरीत्या सभास्थानी आले. मिशन हायस्कूलच्या प्रांगणात ७ युवतींनी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. बारामती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली. (प्रतिनिधी)
कोपडीर्तील पीडितेचे कुंटुंबियही सहभागी
कोपर्डीतील घटनेतील पीडित मुलीच्या आई-वडिलांसह अन्य कुटुंबीयदेखील मोर्चात सहभागी झाले होते. यासह पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार आदी सहभागी झाल्या होत्या. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ हेदेखील मोर्चात सहभागी होते.