मराठा क्रांतीचा आज कोकणभवनवर एल्गार
By admin | Published: September 21, 2016 03:03 AM2016-09-21T03:03:53+5:302016-09-21T03:03:53+5:30
मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील लाखो मराठा नागरिक २१ सप्टेंबरला कोकणभवनवर धडक देणार आहेत.
नवी मुंबई : मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील लाखो मराठा नागरिक २१ सप्टेंबरला कोकणभवनवर धडक देणार आहेत. खारघरपासून मूक मोर्चा काढून मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबविण्यात यावा व कोपर्डीमधील आरोपींना तत्काळ शासन व्हावे या मागण्यांचे निवेदन कोकण आयुक्तांना देण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाला राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळत असून नवी मुंबईमधील मोर्चासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मराठा क्रांती मूक मोर्चाला राज्यभर प्रचंड गर्दी होत आहे. लाखो नागरिक कोणतीही घोषणाबाजी न करता व शांततेमध्ये मोर्चात सहभागी होत असून प्रत्येक मोर्चामध्ये गर्दीचे नवीन विक्रम निर्माण होत आहेत. रायगड ही मराठा साम्राज्याची राजधानी असल्याने येथील मोर्चाकडेही पूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईमधील कोकणभवनवर निघणाऱ्या या मोर्चाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. मोर्चाला कुठेही गालबोट लागू नये. मोर्चासाठीची आचारसंहिता तंतोतंत पाळण्यात यावी. सायन - पनवेल महामार्गावर कोणत्याप्रकारे वाहतूक कोंडी होवू नये यासाठीच्या सूचना सोशल मीडियामधून मंगळवारी उशिरापर्यंत पाठविल्या जात आहे. वाहने कुठे उभी करायची, मोर्चाचा मार्ग याविषयी माहिती दिली जात आहे. मोर्चासाठी वाहतूक पोलिसांनीही जय्यत तयारी केली आहे. आयोजकांशी योग्य संवाद ठेवून महामार्गाच्या सर्व्हिस रोडचा पर्याय निवडण्यात आला आहे. या दरम्यान वाहतूक कोंडी होवू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील मोर्चा यशस्वी करण्यासाठी मराठा समाजातील सर्व राजकीय, सामाजिक संघटना परिश्रम करत आहेत. नवी मुंबई, पनवेल परिसरातील आगरी कोळी बांधवांनाही आवाहन करण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या संघटनांनी मोर्चासाठी सहकार्य केले आहे. रायगड ही मराठा साम्राज्याची राजधानी असल्याने या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आतापर्यंतचे सर्व मोर्चे मराठवाड्यात झाले आहेत. पहिल्यांदाच मुंबईच्या वेशीवर मोर्चा होत असल्यानेही या मोर्चाला विशेष महत्व असल्याने मंंबई, ठाणे परिसरातील संघटनांनीही मोर्चा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी ५० डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले आहे.
>वाहनांसाठी पर्यायी मार्ग
>सायन-पनवेल महामार्ग मुंबई बाजूकडून येणाऱ्या वाहनांनी सीबीडी सर्कल येथे उजवे वळण घेवून भाऊराव पाटील चौक, पार्क हॉटेल, गावस्कर मैदान चौक मार्गे पुढे जातील
पामबीचकडून येणारी वाहने भाऊराव पाटील चौक, पार्क हॉटेल, गावस्कर मैदानकडून इच्छीत ठिकाणी जातील
सायन-पनवेल महामार्ग पनवेल बाजूकडून येणाऱ्या वाहनांनी सीबीडी सर्कल, भाऊराव पाटील चौक, पार्क हॉटेल ते गावस्कर मैदानाकडून पुढे जातील .
>वाहनांसाठी प्रवेशबंदी
सायन-पनवेल महामार्ग मुुंबई बाजूकडून सीबीडी सर्कलपासून महाकाली चौकाकडे जाणारा मार्ग
सीबीडी पामबीचकडून भाऊराव पाटील चौक व सीबीडी सर्कलमार्गे चौकाकडे जाणारा मार्ग
सायन-पनवेल महामार्ग पनवेल बाजूकडून सीबीडी सर्कल येथे येणारे वाहन उजवे वळण घेवून महाकाली चौकाकडे जाणारा मार्ग
>प्रमुख मागण्या
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी
अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरूपयोग होवू नये यासाठी कायद्यात सुधारणा
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उत्पादनखर्चावर आधारित भाव देण्यात यावा
मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तत्काळ पूर्ण करावी