राज्यातील दूध उत्पादकांचा एल्गार, विविध भागात आंदोलनाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 07:30 AM2020-08-01T07:30:23+5:302020-08-01T08:31:20+5:30
महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला अभिषेक करून तसेच ग्रामदेवतांना दुग्धाभिषेक घालून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे.
मुंबई - दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघर्ष समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातील विविध भागात आज पहाटेपासूनच आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले असून, महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला अभिषेक करून तसेच ग्रामदेवतांना दुग्धाभिषेक घालून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला आहे. तसेच दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान देण्याची मागणी केली.
राज्यातील औरंगाबाद, जालना, अमरावती, सांगली, अकोला, पंढरपूर, पुणे आदी भागात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या दूध आंदोलनामध्ये महायुतीमधील घटक पक्षही सहभागी झाले आहेत. माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
दुधाला प्रति लिटर किमान ३० रुपये भाव मिळावा, यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रति लिटर १० रुपयांचे अनुदान सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा. २६ जून रोजी केंद्रातील मोदी सरकारने नोटिफिकेशन काढून बाहेरच्या देशातून १० लाख टन दूध पावडर आयात करण्याचा घेतलेला शेतकऱ्यांचा घात करणारा निर्णय तातडीने रद्द करावा. जेनेरिक मेडिसीनच्या निर्यातीच्या बदल्यात अमेरिकेतून दूध व दुग्ध पदार्थांच्या आयातीला परवानगी देण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा. देशांतर्गत गोदामांमध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी प्रति किलो किमान ५० रुपये अनुदान द्यावे. या मागण्यांसाठी किसान सभा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व समविचारी संघटनांच्या वतीने २० जुलैपासून राज्यात आंदोलन सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल