एल्गार सभेला दंगल सभा म्हणायला हवे, मनोज जरांगे यांचे टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 07:31 AM2023-11-27T07:31:09+5:302023-11-27T07:31:34+5:30
Manoj Jarange-Patil : राज्यात होत असलेल्या एल्गार सभांमधून मंत्री छगन भुजबळ हे मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात होत असलेल्या एल्गार सभांमधून मंत्री छगन भुजबळ हे मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यात दंगली व्हाव्यात, यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याचे सभेतील नेत्यांच्या भाषणांतून दिसत असल्याने या सभांना आता दंगल सभा म्हणायला हवे, अशी टीका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केली.
हिंगोलीतील ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला आणि गोळीबार केला. ही चूक झाल्याचे गृहमंत्र्यांनी मान्य केले होते. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही गुन्हे मागे घेण्यात येईल, असे सांगितले होते. आता मात्र पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू आहे, यात मी खोल जाणारच आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले.
बदनाम करण्यासाठी हॉटेल पेटविले
बीडमध्ये झालेल्या जाळपोळीसारख्या हिंसक घटनेचे समर्थन मी केले नाही. मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी भुजबळ यांच्याच नातेवाइकांनी स्वत:चे हॉटेल पेटविले.
- मनोज जरांगे-पाटील, मराठा आरक्षण नेते.