सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात पुण्यात विविध संघटनांचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 05:01 AM2019-12-30T05:01:57+5:302019-12-30T05:02:13+5:30
समर्थनार्थही निघाले मोर्चे; नाशिकमध्ये मानवी साखळी करून दर्शविला पाठिंबा
पुणे : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए, एनआरसी या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी रविवारी पुण्यात ‘कुल जमाते तंजीम’ संघटनेच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात आला़ यामध्ये मुस्लिम समाजासह अन्य संघटना व समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
संविधान समर्थनार्थ घोषणा देत मोर्चाची सुरूवात सकाळी अकरा वाजता गोळीबार मैदान येथून झाली. दुपारी २ च्या सुमारास विधान भवन येथे हा मोर्चा आला़ हातात तिरंगी झेंडे घेत व ‘संविधान बचाव’च्या घोषणा देत मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला़ मोर्चा सेव्हन लव्ह चौकातून, नेहरू रस्ता, मालधक्का चौक, जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालय येथे आला़ त्यानंतर सीएए, एनआरसी विरोधातील निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयास देण्यात आले.
यावेळी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, निवृत्त सनदी अधिकारी हर्ष मंगल, नीरज जैन आदी मान्यवरांनी सीएए व एनआरसीला विरोध करीत, देशातील एकात्मता टिकविण्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
सीएए कायद्याचे विरोधकांकडून राजकारण; संजय धोत्रेंचा आरोप
अकोला : सीएए, एनआरसी कायद्यामुळे कोणत्याही समुदायाचे नागरिकत्व हिरावले जाणार नाही. सीएए कायद्याचे समर्थन करणे हाच विरोधकांचे तोंड बंद करण्याचा एकमेव मार्ग आहे. सीएए कायद्याचे राजकारण करून विरोधक गैरसमज पसरवित आहेत. परंतु प्रत्येक नागरिक सीएएचे समर्थन करत आहे. सीएएच्या समर्थनार्थ नागरिकांनी पुढे आले पाहिजे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांनी राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे आयोजित रॅलीप्रसंगी व्यक्त केले.
राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीने सीएए, एनआरसीच्या समर्थनार्थ रविवारी मुंगीलाल बाजोरिया प्रांगण ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरिश पिंपळे आदी उपस्थित होते.
नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की, पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार झाले. पाकिस्तानमधील हिंदू, शीख समुदायाचा प्रचंड छळ करण्यात आला. त्यांचे धर्मांतर करण्यात आले; परंतु भारतात अल्पसंख्याक सुरक्षित आहेत. आम्ही राष्ट्रासोबत उभे राहणारे लोक आहोत. राष्ट्राच्या नावाने राजकारण करणारे नाहीत. या तीन देशांमधील अल्पसंख्याक धर्माच्या लोकांना भारत नागरिकत्व देण्यास तयार आहे. अतिथी देवो भव: ही आमची संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या राज्यांतच जाळपोळ - खालीद
यावेळी आयोजित सभेत जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालीद यांनी भाजपवर निशाणा साधत मोर्चाला संबोधित केले़ सीएए आणि एनआरसी कायद्यानंतर, देशभरात अनेक ठिकाणी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढण्यात आले. मात्र ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, त्याच ठिकाणी दंगल घडविण्याचे काम भाजपकडून करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला़ सीएए व एनआरसीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी व अमित शहा यांना सावरकर, मोहम्मद जिना यांच्या विचाराचा हिंदुस्तान बनवायचा आहे़ मात्र आमचा त्याला विरोध असून, आम्हाला महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेला देश हवा आहे, संघीस्थान नको असेही ते म्हणाले़
वरूडमध्ये रॅली
सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ वरुड (जि. अमरावती) शहरातून महारॅली काढण्यात आली. मराठी शाळेच्या प्रांगणातून निघालेल्या या महारॅलीत हजारो नागरिक, व्यापारी सहभागी झाले. हातात भगवे झेंडे आणि तिरंगा घेऊन, वंदे मातरमच्या जयघोष करण्यात आला.
नाशिकमध्ये १६ ठिकाणी मानवी साखळी
कायद्याच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये प्रबोधन मंचच्या वतीने १६ ठिकाणी मानवी साखळी करण्यात आली.