गोमणीत दारूविक्रीविरोधात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:41 AM2018-09-01T00:41:32+5:302018-09-01T00:42:02+5:30
मुलचेरा तालुक्यातील गोमणी हे गाव मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट आहे. १ सप्टेंबरपासून सदर गावात दारूविक्री पूर्णत: बंद करून याविरोधात मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोमणी : मुलचेरा तालुक्यातील गोमणी हे गाव मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट आहे. १ सप्टेंबरपासून सदर गावात दारूविक्री पूर्णत: बंद करून याविरोधात मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
यासंदर्भात मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून शुक्रवारी गावात बैठक पार पडली. या बैठकीला गोमणीच्या उपसरपंच एस.बी.मरापे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू शेंडे, पोलीस पाटील पी.एम.चौधरी, ग्रा.पं.सदस्य एस.एम.चौधरी, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक एस.पी.झरकर आदी उपस्थित होते.
गोमणी गावात एकेकाळी दारूचे लोट वाहत होते. आताही दारूविक्री काही प्रमाणात सुरू आहे. गावातून दारू व अवैध धंदे पूर्णत: हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीत दारूविक्री व सेवनामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. महिला व शाळकरी मुलांनाही त्रास होतो. त्यामुळे गावातून १०० टक्के दारू हद्दपार करण्याचा निर्णय सर्वनूमते घेण्यात आला. या सभेला गावातील १०० ते १२५ नागरिक उपस्थित होते.
गावात झालेली दारूबंदी ही मुक्तिपथ अभियानाच्या जनजागृतीचे यश आहे. ग्रामस्थ व महिलांच्या पुढाकाराने दारूविक्री विरोधात हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. भविष्यात या गावाची नवनिर्मितीकडे वाटचाल होणार आहे, असा विश्वास गोमणीचे मुख्य परिवर्तक सोमेश झरकर यांनी व्यक्त केला आहे. गावात कोणत्याही इसमाने दारूची विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करून त्याची पोलिसाकडे रवानगी करण्याचा निर्णय महिलांनी घेतला.