विधी प्रवेश परीक्षेची वयाची अट रद्द
By admin | Published: March 4, 2017 05:50 AM2017-03-04T05:50:56+5:302017-03-04T05:50:56+5:30
विधी अभ्यासक्रम प्रवेशासाठी घातलेली २१ आणि ३० वर्षांची वयोमर्यादा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली.
मुंबई : विधी अभ्यासक्रम प्रवेशासाठी घातलेली २१ आणि ३० वर्षांची वयोमर्यादा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. त्यामुळे यंदा एप्रिलमध्ये होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला वयाची अट लागू नसल्याने हजारो इच्छुकांचा फायदा होणार असल्याचे मुंबई विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठात सुमारे ३० हजार जणांनी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज नोंदणी केली होती. पण, त्यापैकी जवळपास ५ ते ६ हजार इच्छुकांना वयाची अट असल्यामुळे परीक्षा देणे शक्य झाले नव्हते. पण, आता ज्ञानासाठी एलएलबीचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनाही प्रवेश घेता येईल, असे मुंबई विद्यापीठ विधी प्रबोधिनीचे संचालक डॉ. अशोक येंडे यांनी सांगितले.
सर्वाेच्च न्यायालयाने वयाची अट रद्द केल्यामुळे आता अनेकांचा फायदा होणार आहे. यामुळे नोकरी करत लॉचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता शिक्षण घेता येईल, असे मत स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)