‘आयसोलेटेड’ विद्यार्थी डी.फार्म.साठी पात्र
By admin | Published: August 11, 2016 04:38 AM2016-08-11T04:38:07+5:302016-08-11T04:38:07+5:30
‘आयसोलेटेड’ विद्यार्थी डी. फार्म. अभ्यासक्रमासाठी पात्र असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले.
नागपूर : ‘आयसोलेटेड’ विद्यार्थी डी. फार्म. अभ्यासक्रमासाठी पात्र असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले. तसेच, या विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्याचे निर्देशही तंत्रशिक्षण संचालकांना दिले. न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय देऊन संबंधित रिट याचिका निकाली काढली.
तंत्रशिक्षण संचालकांनी १३ जुलै २०१६ रोजी सर्व संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठवून आयसोलेटेड विद्यार्थ्यांना डी. फार्म. अभ्यासक्रमामध्ये प्रवेश नाकारण्यास सांगितले होते. याविरुद्ध किशोर भारस्करसह पाच आयसोलेटेड विद्यार्थ्यांनी रिट याचिका दाखल केली होती. डी. फार्म. अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी विज्ञान शाखेतून रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या अनिवार्य विषयांसह जीवशास्त्र किंवा गणित यापैकी एक विषय घेऊन इयत्ता बारावी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
सुरुवातीला वाणिज्य किंवा कला शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेची पदवी हवी असल्यास रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या अनिवार्य विषयांसह जीवशास्त्र किंवा गणित यापैकी एक विषयात आयसोलेटेड परीक्षा देता येते. अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीपर्यंत डी. फार्म. अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येत होता. परंतु, यावर्षी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या अनिवार्य विषयांसह जीवशास्त्र किंवा गणित यापैकी एक विषयात आयसोलेटेड परीक्षा उत्तीर्ण करणारे वाणिज्य किंवा कला शाखेचे विद्यार्थी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या समकक्ष असल्याचे सांगितले. हे उत्तर लक्षात घेता तंत्रशिक्षण संचालकांनी आयसोलेटेड विद्यार्थ्यांना डी. फार्म. अभ्यासक्रमात प्रवेश देण्याची तयारी दर्शविली. यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे निर्णय दिला. (प्रतिनिधी)