उमलत्या जिवांचे आरोग्य धोक्यात!
By Admin | Published: July 9, 2017 12:45 AM2017-07-09T00:45:27+5:302017-07-09T00:45:27+5:30
मराठवाड्यातही दप्तराचे ओझे वाढत आहे. मुलांच्या वजनाच्या सरासरी २५ टक्के दप्तराचे ओझे असते. या भाराने वाकलेले विद्यार्थी, असे चित्र सर्रास दिसते.
मराठवाड्यातही दप्तराचे ओझे वाढत आहे. मुलांच्या वजनाच्या सरासरी २५ टक्के दप्तराचे ओझे असते. या भाराने वाकलेले विद्यार्थी, असे चित्र सर्रास दिसते. बीड, अंबाजोगाई, परळी गेवराई, माजलगाव, केज, धारुर, वडवणी आदी मोठ्या शहरांत विशेषत: खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाहायला मिळते. शाळांच्या बदलत्या ट्रेंडमुळे ग्रामीण भागातही हे लोन हळूहळू पसरत आहे. मुलांच्या वयाच्या तुलनेत पाठीवर वजन जास्त असल्याने पाठ दुखणे, थकवा, अशक्तपणा, चिडचिडेपणा अशी लक्षणे अंदाजे २० टक्के मुलांमध्ये दिसून येतात. मुले ‘स्कूल बॅग सिंड्रोम’चे शिकार बनत आहेत, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी सांगितले.
नाकापेक्षा मोती जड
यवतमाळ : यवतमाळातील विविध शाळांना भेटी दिल्या असता, क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे दप्तर विद्यार्थ्यांच्या पाठीवर आढळून आले. दुपारी शाळा सुटल्यावर दोन विद्यार्थ्यांचे दप्तर त्यांच्या आर्इंनी उचलून नेले. तर थकलेले विद्यार्थी त्यांच्या मागून घराच्या दिशेने चालू लागले. या दोन मातांशी बातचीत केली असता, त्या म्हणाल्या, ‘तुम्ही दप्तर उचलून तर पाहा. ही पोरं एवढं वजनी दप्तर उचलतीलच कसे? म्हणून आम्हाला यावे लागते... पण पेपरमध्ये आमचे नाव नका छापू. शाळेवाले आमचा राग करतील...’ अशी भयावह अवस्था खासगी शाळांमध्ये दिसते.
गृहपाठ नको
नागपुरातील निवृत्त प्राध्यापक राजेंद्र दाणी यांनी दप्तराचे ओझे व त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचा सखोल अभ्यास केला आहे. बऱ्याच शाळांमध्ये केजी-१ ते दुसऱ्या वर्गातील बालकांना नियमित गृहपाठ देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे बालपण हिरावले जात आहे. दुसऱ्या वर्गापर्यंत गृहपाठच नको असे त्यांचे मत आहे.
निम्मी पुस्तके शाळेत
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील काही शाळांनी निम्मी पुस्तके शाळेतच ठेवून दप्तराचे ओझे कमी केले आहे. अभ्यासक्रमातील निम्मी पुस्तके शाळेतच ठेवण्यात येत आहेत. शिवाय काही मोठ्या वह्यांचे दोन भाग करून दप्तराचे वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे वर्धा येथील चन्नावार ई-लर्निंग स्कूलच्या मुख्याध्यापक अपूर्वा शेंडे यांनी सांगितले.
चौथीपर्यंत कंपासपेटीला बंदी
शासनाने ठरवलेल्या आदर्श वजनात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी कंपासपेटी वापरू नये, अशी सक्त ताकीद दिलेली आहे. तरीही बहुतेक शाळांमधील चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात कंपासपेटी दिसते. काही ठिकाणी शाळांकडूनच साहित्याच्या नावाखाली चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कंपासपेटी दिली जात असल्याचे निदर्शनास आले.
दप्तराचे ओझे वाढतेच
पुणे : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या २० ते ३० टक्क्यांपेक्षाही जास्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून कागदोपत्री आदेश काढण्यापलीकडे काहीही केले जात नाही.
विद्यार्थ्यांच्या दप्तरात किती पुस्तके असावीत याची नियमावली असताना शाळा आणि प्रकाशन संस्था यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तके बंधनकारक केली जात आहेत. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार किती पुस्तके दप्तरात असावीत याचे नियोजन शाळेने करणे आवश्यक आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांचा शाळेतच गृहपाठ व वर्गपाठ करून घ्यावा. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याचे वह्या-पुस्तकासाठी स्वतंत्र कप्पे तयार केल्यास पुस्तकांचे ओझे निश्चितपणे कमी होईल.
- अरविंद देशमुख,
शिक्षणतज्ज्ञ, नांदेड
दप्तरात अनावश्यक वस्तू न आणण्याविषयी विद्यार्थ्यांना सूचना देण्यास सर्व शाळांना सांगितले आहे. मात्र, शाळांसोबतच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या दप्तरावर लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांपेक्षा खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हा प्रश्न तीव्र आहे. लवकरच अशा शाळांमध्ये शिक्षक, पालक यांच्याकरिता तज्ज्ञांची मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात येईल.
- डॉ. सुचिता पाटेकर,
प्राथमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ
शाळांचे डिजिटायजेशन होऊ लागले आहे. आॅनलाइन कार्यप्रणाली सुरू झाली आहे. त्यामुळे स्थूल अभ्यासक्रमाऐवजी सूक्ष्म अभ्यासक्रमावर भर दिल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचे ओझे कमी होऊ शकते. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हे सहज शक्य आहे. त्यादृष्टीने विशेष प्रयत्न व्हावेत.
- हिना छाबडा, शिक्षण संस्था संचालिका, सेंट फ्रान्सिस स्कूल अमरावती