शहर काँग्रेसची आज तातडीची बैठक
By Admin | Published: July 11, 2017 12:55 AM2017-07-11T00:55:15+5:302017-07-11T00:55:15+5:30
नेत्यांच्या स्वहिताने काँग्रेस रसातळाला’ या सोमवारच्या ‘लोकमत’मधील वृत्ताने काँग्रेसच्या वर्तुळात आज खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘नेत्यांच्या स्वहिताने काँग्रेस रसातळाला’ या सोमवारच्या ‘लोकमत’मधील वृत्ताने काँग्रेसच्या वर्तुळात आज खळबळ उडाली. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मंगळवारी तातडीने बैठक बोलावली आहे. काँग्रेस भवन येथे दुपारी ४ वाजता ही बैठक होईल.
काँग्रेसमध्ये माजलेल्या बजबजपुरीबाबत काँग्रेसच्याच सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सलग तीन मोठ्या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. महापालिकेत २९ नगरसेवकांचे फक्त ९ नगरसेवक झाले, कसला कार्यक्रम नाही, आंदोलन नाही, फक्त पत्रके काढली जातात, अशी खंत या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असते.
‘लोकमत’च्या वृत्तातून याच भावना व्यक्त झाल्या होत्या. त्याची चर्चा सोमवारी दिवसभर राजकीय वर्तुळात होती.
पक्षाच्या प्रदेश शाखेकडेही या वृत्ताची कात्रणे काही कार्यकर्त्यांनी पोहोचवली. त्यामुळे प्रदेश शाखेकडूनच तातडीने अशी बैठक घेण्याचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती मिळाली. पक्षाच्या बूथ कमिट्या तसेच ब्लॉक पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीचाही कार्यक्रम सध्या सुरू आहे. त्याचीही चर्चा याच बैठकीत होणार असल्याचे समजते. पक्षाचे महापालिकेतील सर्व नगरसेवक, शहर संघटनेतील पदाधिकारी तसेच सर्व आघाड्यांचे प्रमुख यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.