महापालिकेमधील आणीबाणी कायम

By admin | Published: November 2, 2016 02:28 AM2016-11-02T02:28:42+5:302016-11-02T02:28:42+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावानंतरही पालिकेमधील आणीबाणीची स्थिती कायम आहे.

Emergency in the municipal corporation | महापालिकेमधील आणीबाणी कायम

महापालिकेमधील आणीबाणी कायम

Next

नामदेव मोरे,

नवी मुंबई- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावानंतरही पालिकेमधील आणीबाणीची स्थिती कायम आहे. शासनाने बदली न केल्याने आयुक्त नेहमीप्रमाणे कामकाज पाहात आहेत. दुसरीकडे लोकप्रतिनिधींनी आयुक्तांचे आदेश पाळू नका अशा सूचना दिल्या आहेत. आयुक्त व लोकप्रतिनिधींच्या भांडणामध्ये पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व शहरवासी भरडले जात आहेत.
दिवाळीनिमित्त महापालिका मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पामबीचवरून जाताना मुख्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हजारो नवी मुंबईकर रोज रोषणाई पाहण्यासाठी मुख्यालय परिसरात जात आहेत. बाहेरून दिव्यांचा लखलखाट असला तरी प्रत्यक्षात महापालिकेमध्ये मात्र आणिबाणीची स्थिती कायम आहे. चार दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी महापालिका पुन्हा सुरू होत आहे. कार्यालयात जाण्याच्या कल्पनेनेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यापासून शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘आयुक्त हटाव, लोकशाही बचाव’ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरपीआयचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेवून त्यांना अविश्वास ठरावामागील वस्तुस्थिती समजावून सांगितली आहे. सोशल मीडियामधून आयुक्त हटाव मोहीम तीव्र केली आहे. दुसरीकडे आयुक्तांच्या समर्थनामध्येही सोशल मीडियामधून जनजागृती केली जात आहे. दिवाळीमुळे चार दिवस ही मोहीम काही प्रमाणात शांत झाली होती. पण बुधवारपासून पुन्हा आयुक्त समर्थक व विरोधक एकमेकांविरोधात सोशल वॉर सुरू करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुक्तांनी अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतरही त्यांचे काम सुरूच ठेवले आहे. नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या बांधकामास नोटीस दिली आहे. यामुळे पुन्हा नवी मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे.
आयुक्त व लोकप्रतिनिधी वादाचा फटका शहरवासीयांना बसू लागला आहे. दिवाळीच्या काही दिवस अगोदर पाणीपुरवठा अनियमित सुरू झाला होता. कचरा वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील गटारांवरील झाकणे बसविली जात नाहीत. अनेक समस्या जैसे थे आहेत. सर्वाधिक फटका अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसू लागला आहे. अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, पालिकेमध्ये २० वर्षांमध्ये एवढी गंभीर स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. सर्वच अधिकारी व कर्मचारी तणावाखाली आहेत. आयुक्तांना सहकार्य केले तर लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागणार व लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकले तर आयुक्तांकडून कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयुक्त समर्थक व विरोधक दोन्हींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असून त्यामुळे महापालिकेची व येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदनामी होत असल्याची खंतही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
>दिवाळी तणावाखालीच
पालिकेमधील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सद्यस्थितीमध्ये सर्वांवरील ताण वाढला आहे. आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्या वादामध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बळी जाण्याची भीती वाटत आहे. मुख्यालयाभोवती लखलखाट असला तरी मनामध्ये अंधार कायम आहे. जोपर्यंत हा वाद कायमस्वरूपी थांबणार नाही तोपर्यंत मनातील भीती जाणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
>लोकप्रतिनिधी भूमिकेवर ठाम
शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादी नगरसेवकांनी आयुक्तविरोधी भूमिका ठाम असल्याचे मत व्यक्त केले आहे. अविश्वास ठराव आल्यानंतर पुन्हा संवाद निर्माण होण्याची शक्यताच नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. महापौर सुधाकर सोनावणे यांनीही आम्ही भूमिकेवर ठाम असून खूप विचारांती व शहराच्या हितासाठी अविश्वास ठराव आणला आहे. आम्ही लोकशाही मार्गाने हा लढा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
>प्रतिमा मलिन
पालिकेमधील वादामुळे आयुक्त तुकाराम मुंढे समर्थक व विरोधक यांच्यामध्ये सोशल वॉर सुरू आहे. या भांडणामध्ये महापालिकेची प्रतिमा मलिन केली जात आहे. नवी मुंबई महापालिकेने २५ वर्षांमध्ये फक्त घोटाळेच केले असल्याचे वातावरण निर्माण होत आहे. यामुळे प्रशासनामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Web Title: Emergency in the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.