आणीबाणीचे समर्थन करणाऱ्यांनी बोलू नये
By Admin | Published: February 20, 2017 01:37 AM2017-02-20T01:37:17+5:302017-02-20T01:37:17+5:30
देशावर लादलेल्या आणीबाणीचे ज्या शिवसेनेने समर्थन केले, त्या पक्षाच्या नेत्यांना आणीबाणीवर बोलण्याचा अधिकारच नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
ठाणे : देशावर लादलेल्या आणीबाणीचे ज्या शिवसेनेने समर्थन केले, त्या पक्षाच्या नेत्यांना आणीबाणीवर बोलण्याचा अधिकारच नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ठाण्यात लगावला आणि आणीबाणीच्या समर्थनाबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करताना ते बोलत होते. ‘सामना’वर बंदी घालण्याची आमची इच्छा नव्हती. पण, त्या मागणीचा आधार घेत ‘आमच्यावर आणीबाणीची परिस्थिती लादण्यासाठी दबाव आणला जात आहे,’ असा आव शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आणला असला, तरी ज्या वेळी आणीबाणी लादली, तेव्हा याच शिवसेनेने आणीबाणीचे समर्थन केले होते, असा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे थेट शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
ठाण्यात सरस्वती इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या पटांगणावर आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ठाण्यात शिवसेनारूपी रावणाचे दहन करा, असे आवाहनही त्यांनी केले. ज्या वेळी देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा माझे आजोबा आणि वडील तुरुंगात गेले होते. कारण, आम्हाला लोकशाही हवी होती, परंतु शिवसेनेने आणीबाणीला समर्थन दिले होते. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बंदिस्त करण्याचा प्रयत्न झाला, त्याला विरोध करत आमचे स्वयंसेवक दोनदोन वर्षे तुरुंगात गेले. त्यामुळे आज लोकशाही जिवंत ठेवण्यात आमचा मोलाचा वाटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमच्या सिंहाची-भाजपाची ताकद आम्हाला माहीत होती, परंतु काही काळ हा सिंह हरवला होता आणि तो बकरीच्या कळपात गेला होता. आता तो स्वतंत्र झाला आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)