कर्तबगार पोलिसांच्या सन्मानाला अखेर मुहूर्त! १६ जानेवारीला वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 05:12 AM2018-01-02T05:12:32+5:302018-01-02T05:12:43+5:30
समाजात कायदा व सुव्यवस्थेसाठी कार्यरत असताना, बजावलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेत, केंद्रीय गृहविभागाने त्यांना जवळपास ४ वर्षांपूर्वी पदकाची घोषणा केली होती.
- जमीर काझी
मुंबई : समाजात कायदा व सुव्यवस्थेसाठी कार्यरत असताना, बजावलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कार्याची दखल घेत, केंद्रीय गृहविभागाने त्यांना जवळपास ४ वर्षांपूर्वी पदकाची घोषणा केली होती. प्रत्यक्षात सन्मानाच्या प्रतीक्षेत त्यातील काही जण सेवानिवृत्त झाले. नव्या वर्षात मात्र त्यांची ही प्रतीक्षा संपणार असून, १६ जानेवारीला पदक वितरणाचा सोहळा होणार आहे.
२०१५ साली प्रजासत्ता व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्टÑपती पोलीस पदक जाहीर झालेल्या शंभर पोलीस अधिकारी, अंमलदारांना राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पदकाचे वितरण करण्यात येईल. राजभवन किंवा पोलीस मुख्यालयात होणारा हा सोहळा यंदा नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होईल. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्टÑपती पदक व पोलीस पदक विजेत्यांची घोषणा होते. राज्य सरकारने पाठविलेल्या प्रस्तावानुसार, त्याबाबत निर्णय घेतला जातो. पुरस्काराची घोषणा झाल्यावर संबंधितांच्या नावाने बनविलेले पदक केंद्राकडून संबंधित राज्यांना पाठविले जाते. त्यासाठी ६ ते ८ महिन्यांचा अवधी अपेक्षित असतो. मात्र, २०१५ या वर्षात घोषित झालेले पुरस्कार पदकांचे काम अपूर्ण असल्याने अद्याप दिले नव्हते. आता त्याची तारीख निश्चित झाली असून, येत्या १६ जानेवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ४ वाजता हा सोहळा होईल. त्यापूर्वी १४ जानेवारीला या कार्यक्रमाची रंगीत तालीम सोहळ्याच्या ठिकाणी होणार आहे.