उद्योजकतेची ‘भाषा’ आत्मसात करा!

By admin | Published: August 21, 2016 02:23 AM2016-08-21T02:23:22+5:302016-08-21T02:23:22+5:30

‘स्टार्ट अप’ हे उद्योग विश्वातील ‘लेटेस्ट व्हर्जन’ आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही तरुणांसाठी ते सर्वात ‘अर्थपूर्ण’ माध्यम आहे. कारण यात पैशांपेक्षा कल्पकता हेच मुख्य भांडवल असणार आहे

Emote the language of entrepreneurship! | उद्योजकतेची ‘भाषा’ आत्मसात करा!

उद्योजकतेची ‘भाषा’ आत्मसात करा!

Next

- नितिन पोतदार

‘स्टार्ट अप’ हे उद्योग विश्वातील ‘लेटेस्ट व्हर्जन’ आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही तरुणांसाठी ते सर्वात ‘अर्थपूर्ण’ माध्यम आहे. कारण यात पैशांपेक्षा कल्पकता हेच मुख्य भांडवल असणार आहे. त्याचा विस्तार करण्यासाठी शासनाच्या विविध योजना रेड कार्पेट अंथरून तयार आहेत. अनेक परकीय गुंतवणूकदारही आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यासाठी उत्सुक आहेत. या कल्पकतेला प्रोफेशनल अ‍ॅप्रोचची जोड देणे तितकेच गरजेचे आहे. या दिशेने पुढे पाऊल टाकताना त्यांनी सर्वप्रथम उद्योजकता म्हणजे काय? हे समजून घेतले पाहिजे. सोप्या शब्दांत सांगायचे, तर उद्योजकता म्हणजे विविध गोष्टींचा कल्पकतेने, धाडसाने म्हणजे जोखीम पत्करून आणि स्मार्ट वापर करून संपत्तीची निर्मिती करणे. एकदा का हे तंत्र नीट आत्मसात केले की, पुढे कितीही अडचणी आल्या, तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे फारसे कठीण जात नाही. मात्र, यात शिकण्याची प्रक्रिया संपली की, त्या उद्योगाचा विकास खुंटतो हे आपण बघतो.

‘उद्योजकता’ म्हणजे कोणत्याही उद्योगाचा ‘आत्मा’! उद्योगारूपी शरीरात आत्मा म्हणजे उद्योजकताच नसेल, तर औद्योगिक चैतन्य कसे निर्माण होणार? या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच नावीन्यपूर्ण कल्पना मांडणारे उद्योजक आणि व्यावसायिक यांच्या कामाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने, दरवर्षी २१ आॅगस्ट हा ‘जागतिक उद्योजकता दिवस’ (WED) म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या वतीने  (Alliance of International Business Associations) या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या निमित्ताने होणारी व्याख्याने तरुण पिढीला आपल्या कल्पकतेतून आर्थिक उन्नती कशी साधायची आणि आव्हाने स्वीकारून परिस्थिती सुधारण्यासाठी रचनात्मक मार्ग कसा चोखाळायचा, याचे परिणामकारक मार्गदर्शन करतात, तर विविध चर्चासत्रे नैतिक आणि निर्णय करणारे तरुण घडवण्यास मदत करतात. एकूणच उद्योजकता वृत्तीचा योग्य व सकारात्मक पद्धतीने प्रसार-प्रचार व्हावा, यावर त्यात विशेष भर असतो.
महाराष्ट्र राज्य भारताची औद्योगिक तर मुंबई ही आर्थिक राजधानी होय आणि म्हणून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा आणि पयार्याने इथल्या मराठी माणसांच्या प्रगतीचा विचार करावाच लागेल.
गेल्या दोन दशकांतील मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी निगडित वाढत्या एकात्मकतेमुळे महाराष्ट्रासह भारतातील उद्योग क्षेत्रात खूप मोठे बदल झाले आहेत. जागतिकीकरणाच्या परिणामांमुळे नवीन सेवा क्षेत्रांसह सर्वच औद्योगिक क्षेत्रांमधे देशात-परदेशात मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या उगमामुळे भौगोलिक आणि व्यापाराच्या सीमा मोडून पडल्या आहेत.  Today Idea is the capital! त्यामुळे उद्यमशीलता काही निवडक लोकांची मक्तेदारी राहिलेली नसून, ज्यांच्याकडे कल्पकता आहे, अशांना संधी प्राप्त झालेली दिसते.
आजच्या तरुणांना इंटरनेटमुळे प्रत्येक क्षेत्राची जगभरातील माहिती उपलब्ध आहे. सेवा क्षेत्रातही स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी आज उपलब्ध झाल्या आहेत. म्हणूनच आजच्या तरुणांचा ‘नोकरी’ करण्यापेक्षा स्वत: काहीतरी निर्माण करण्याकडे कल असतो आणि तो योग्यच आहे, असे मला वाटते.
अनेक मोठे उद्योग आणि उद्योगपती स्वत:ला बदलायला तयार नसल्याने व बदलण्यासाठी शिकावे लागते, हे मान्य करायला तयार नसल्याने काळाच्या ओघात मागे पडले. सांगायचा मुद्दा उद्योजकता शिकवता येते का? तर त्याचे उत्तर निश्चितच ‘होय’ असेच द्यावे लागेल. युरोप, अमेरिका, जपान, आॅस्ट्रेलियासारख्या देशांत शालेय वयापासूनच मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजकता शिकवली जाते. तसे वातावरण भारतात प्रामुख्याने औद्योगिक विकासात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात अद्याप दिसत नाही, ते निर्माण करायला पाहिजे.
आज शाळाशाळांत विविध विषय शिकवले जातात, पण उद्योजकता अजूनही शालेय पाठ्यपुस्तकात शिकवली जात नाही. खरे तर उद्योजकतेची ‘भाषा’ शाळेपासूनच शिकवली आणि आत्मसात केली गेली पाहिजे. ‘मॅक्सप्लोअर- स्कूल आॅफ बिझनेस’ हा उपक्रम त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
उद्योजकीय प्रशिक्षणाचा मोठा अनुभव निरीक्षणावर आधारित असतो. इतरांचे प्रयोग, चुकांमधून आणि यश देणाऱ्या कल्पकतेकडे डोळसपणे पाहत, हे शिक्षण आत्मसात करायचे असते. उद्योजकीय कुटुंबात हे प्रशिक्षण बालपणापासूनच रुजत असते, परंतु ज्यांना उद्योजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेली नाही, अशांचे काय? त्यांनी हे प्रशिक्षण जोमाने, चोहोबाजूंनी मिळवत राहिले पाहिजे. आता हेच उदाहरण पाहा. जपानवर अणुबॉम्ब पडल्यानंतर, जपानी राज्यकर्त्यांनी नवा उद्योजकीय जपान निर्माण करताना, तेथील तरुणांना उद्योजकतेचे धडे मिळतील तेथून मिळवून दिले, तर उत्तम उद्योजकीय वातावरण घरी असतानाही कित्येक घराण्यातील तरुण ‘वैश्विक उद्योजकते’चे धडे गिरवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या संस्थेत भरती झालेले होते, हे लक्षात घ्यायला हवे.
अर्थात, ज्ञानाधारित उद्योगविश्वात व सेवाक्षेत्रात स्वत:चे स्थान मिळवलेले व मिळवू पाहात असलेले आपल्या समाजातले आजचे तरुण आणि शिक्षणाअभावी मागे पडलेला आपल्याच समाजातील एक वर्ग यांच्यात एक मोठी दरी पाहायला मिळते. ती कमी करण्यासाठी गरज आहे, ती विविध स्तरांत सक्षम आणि फक्त प्रगतीचीच भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्राची!
कळेल ती भाषा, मिळेल ते काम,
पडेल ते कष्ट, तेव्हाच होईल जय महाराष्ट्र ..

(लेखक कॉपोर्रेट लॉयर असून मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक आहेत.)

Web Title: Emote the language of entrepreneurship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.