Emotional Story: वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखले; मुलींनीच दिला आईला खांदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 08:45 AM2022-01-03T08:45:41+5:302022-01-03T08:47:17+5:30

Emotional Story: वीस वर्षांपूर्वी मुलांनी आईला काढले होते घराबाहेर : मुली, जावयांकडून सांभाळ. आईचे निधन झाल्याचे कळताच तिघांपैकी दोन मुलगे पाहुण्यासारखे आले. बहीणींनीच निर्णय घेतला.

Emotional Story: Preventing brothers from being cremated of mother; girls gave the shoulder | Emotional Story: वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखले; मुलींनीच दिला आईला खांदा

Emotional Story: वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखले; मुलींनीच दिला आईला खांदा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड / लिहाखेडी (जि. औरंगाबाद) : देवाचे रूप असलेल्या आईला तिच्या पोटच्या गोळ्यांनीच वीस वर्षांपूर्वी घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा ‘त्या’ आईला आधार दिला, तो मुली व जावयांनी. अखेर वृद्धापकाळाने शनिवारी त्या आईने जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोघांनी फक्त पाहुण्यांसारखी हजेरी लावल्याने, संतप्त लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. तिन्ही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने खांद्यावर आईची तिरडी घेऊन स्मशानभूमी गाठत अंत्यसंस्कार केले.  

औरंगाबादच्या हर्सुल परिसरातील ही घटना असून चंद्रभागाबाई आनंदा साखळे (९०, मूळ रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) असे निधन झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्यांना सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे (रा. औरंगाबाद), सुनीता शिवाजी सोने (रा. अनवी), जिजाबाई उत्तम टाकसाळे (रा. कोटनांद्रा), तर जाऊबाई छाया शिरसाठ (रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) यांनी खांदा दिला.    
मुलांनी चंद्रभागाबाईंना वाऱ्यावर सोडले होते. पण तरीही त्या माऊलीला आपल्या तिन्ही मुलांना भेटायची इच्छा होती. अनेक वेळा तिन्ही मुलांना फोन करूनही ते आईला बघायला फिरकले नाहीत. शेवटी मुलांच्या भेटीविनाच तिने आपले प्राण त्यागले. 

पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकविले   
पोटाला चिमटा घेऊन चंद्रभागाबाईंनी तिन्ही मुलांसह मुलींना शिक्षण दिले. एक मुलगा सेवानिवृत्त कृषी अधिकारी, दुसरा उच्च न्यायालयात क्लर्क, तर  तिसरा मुलगा एका खासगी कंपनीत उच्च पदावर आहे. पण या मुलांनी सुखाच्या प्रसंगात आईला आपल्यापासून दूर केले. अखेर त्या आईला मायेचा आधार मिळाला, तो औरंगाबाद शहरात राहणारी मुलगी सुभद्रा व जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांचा.

असे निर्दयी भाऊ कुणाला मिळू नयेत... 
तीस वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. तेव्हापासून माझ्या भावांनी आईला सोडून दिलेले आहे. सुरुवातीची दहा वर्षे ती आम्हा बहिणींकडे राहत असे, तर गेल्या वीस वर्षांपासून ती माझ्याकडे हाेती. मुलगी या नात्याने मी तिचे सर्व कर्तव्य पूर्ण केले. पण, भाऊ मात्र कर्तव्य विसरले. असे निर्दयी भाऊ व मुले कुणाला मिळू नयेत.      
- सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे, मुलगी

Web Title: Emotional Story: Preventing brothers from being cremated of mother; girls gave the shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.