नव्या वर्षात जबाबदार पर्यटनावर भर; पर्यावरण संतुलन, रोजगार, शाश्वत विकासाचे धोरण
By स्नेहा मोरे | Published: January 15, 2024 07:40 PM2024-01-15T19:40:33+5:302024-01-15T19:41:09+5:30
जबाबदार पर्यटनाची अंमलबजावणी करत असताना पर्यटन विभागाने राज्यातील एमटीडीसीच्या सर्व रिसोर्टमध्ये कृत्रिम खाद्यरंगांच्या वापराला प्रतिबंध केला आहे.
मुंबई - राज्यातील पर्यटनाला अधिकाधिक व्यापक स्वरुपात विकसित करण्यासाठी शासनाच्या पर्यटन विभागाने नव्या वर्षात जबाबदार पर्यटनाचे धोरणावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. या माध्यमातून पर्यटकांनी केवळ पर्यटन न करता त्यासोबतच पर्यावरण संतुलन, रोजगार संधी, स्थानिक कला व कलाकारांना प्रोत्साहन आणि स्थानिक अर्थकारणाचे बळकटीकरण करावे या उद्देशाने काम करण्यात येणार आहे.
जबाबदार पर्यटनाची अंमलबजावणी करत असताना पर्यटन विभागाने राज्यातील एमटीडीसीच्या सर्व रिसोर्टमध्ये कृत्रिम खाद्यरंगांच्या वापराला प्रतिबंध केला आहे. रिसोर्टमधील जेवणात अजिनोमोटो या आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या घटकाचा वापरही बंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, राज्यभरात पर्यटन विभागाच्या कार्यालयात वा रिसोर्टमध्ये सिंगल युज प्लास्टिक प्रतिबंधित असून शिवाय, खाद्यपदार्थ पॅकिंग करण्यासाठीही केवळ बायोडिग्रेडेबल पॅकेजेसचा वापर करण्यात येतो. तसेच, राज्यभरातील पर्यटन विभागाच्या रिसोर्टमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण, जल संधारण, जैवविविधतेचे संवर्ध आणि वृक्षारोपण केले जाते. याखेरीस, विशेष म्हणजे दिव्यांग वा मनोरुग्णांसाठी विशेष पर्यटन टूरचे आयोजनही केले जाते, अशी माहिती पर्यटन विकास महामंडळाचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी दिली आहे.
स्थानिक अर्थकारणाचाही प्राधान्याने विचार
जबाबदार पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार मिळावा या हेतूने पर्यटन विभागाकडून आदरातिथ्याचे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच, स्थानिक कला- खाद्य संस्कृतीलाही प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न व्यापक स्वरुपात करण्यात येणार आहे. ही संकल्पना पर्यावरणीय शाश्वतता, जैवविविधतेचे संरक्षण, आर्थिक शाश्वतता, सामाजिक-सांस्कृतिक शाश्वततेला चालना, शाश्वत पर्यटन प्रमाणीकरणासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शाश्वत विकासाच्या सकारात्मकतेच्या दिशेने पाऊल
पर्यटन आणि पर्यावरण यांचा विशेष संबंध आहे. त्यांचा एकमेकांशी संवाद ही दुहेरी प्रक्रिया आहे. एकीकडे पर्यावरण संसाधने पर्यटनाच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत. नैसर्गिक आणि मानवनिर्मित पर्यटन स्थळे एक प्रकारे पर्यटन संधी तयार करतात, ज्याचा पर्यटक आनंद घेतात, तिथे राहतात आणि आराम करतात. दुसरीकडे, पर्यटक, आयोजक समुदाय आणि स्थानिक वातावरण यांच्यातील जवळचे आणि थेट संबंध एक संवेदनशील परिस्थिती निर्माण करतात. ज्यायोगे पर्यटन शाश्वत विकासासाठी खूप सकारात्मक देखील असू शकते. या अनुषंगाने पर्यटन क्षेत्रातील विविध भागधारकांमधील लवचिकता, टिकाऊपणा आणि परस्परसंबंध यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यामुळे पर्यावरणीय, सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक शाश्वतता यासह शाश्वत पर्यटनाच्या तत्त्वांचा अवलंब करण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळेल. - श्रद्धा जोशी , व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ