प्रकल्पग्रस्त आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम
By admin | Published: July 18, 2016 02:34 AM2016-07-18T02:34:23+5:302016-07-18T02:34:23+5:30
गावठाणमधील घरांवर कारवाईविरोधात सोमवारी पुकारलेल्या बंदवरून तुर्भे येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी भाजपासह सर्वपक्षीय नेत्यांना धारेवर धरले.
नवी मुंबई : गावठाणमधील घरांवर कारवाईविरोधात सोमवारी पुकारलेल्या बंदवरून तुर्भे येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी भाजपासह सर्वपक्षीय नेत्यांना धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर बंदमधून माघार घेत असल्याचे सांगण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर अविश्वास दाखवत बंद होणारच अशा घोषणा केल्या. यावेळी इतर पक्षीय नेत्यांनी बंदला पाठिंबा दर्शवत भाजपाची कोंडी केली.
गावठाणमधील प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी सर्वपक्षीयांना सोबत घेवून सोमवारी बंदची घोषणा केली होती. तुर्भे येथील होणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने आमदार म्हात्रे पालिका आयुक्तांच्या भेटीला गेल्या होत्या. यावेळी आयुक्तांनी त्यांना धुडकावून लावले होते. त्यानंतर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात हा लढा उभारण्यात आलेला आहे. परंतु आंदोलनापूर्वीच रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार मंदा म्हात्रे यांची बैठक झाली. या बैठकीत पावसाळ्यापुरती कारवाईला स्थगिती देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. ही माहिती प्रकल्पग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याकरिता त्यांनी दुपारी तुर्भे येथे पत्रकार परिषद तसेच बैठक आयोजित केली होती. यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी मंदा म्हात्रे यांनाच धारेवर धरले. आंदोलनाची घोषणा करताना सर्वपक्षीयांना सोबत घेतले असताना, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला त्या एकट्याच कशा गेल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी उपस्थित काँग्रेस जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी भाजपा व मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली.
तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी देखील मुंढे यांची प्रशंसा केलेली असल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. मंदा म्हात्रे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही प्रकल्पग्रस्तांमधील उद्रेक शांत झाला नाही. यावेळी इतकी वर्षे दुसरे मुख्यमंत्री होते, तेव्हा का कारवाया थांबल्या नाहीत, असा आमदार म्हात्रे यांनी उलट प्रश्न विचारताच वातावरण अधिकच तापले. अखेर नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावापुढे नमते घेत त्यांना बैठकीतून काढता पाय घ्यावा
लागला.
त्यानंतर सभागृहात उपस्थित १५० ते २०० च्या जमावाने त्या बैठकीवर ताबा घेतला. आम्हाला कोणत्याच राजकीय पक्षाची भूमिका इथे नको असून, केवळ प्रकल्पग्रस्तांची भूमिका हवी असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित इतर सर्वपक्षीय नेत्यांनाही धारेवर धरले. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच शाब्दिक चकमक उडू लागली. अखेर शिवसेनेच्या वतीने विठ्ठल मोरे, नामदेव भगत यांनी, काँग्रेसच्या वतीने दशरथ भगत
यांनी तर राष्ट्रवादीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना आंदोलनात पाठिंबा दर्शवला. (प्रतिनिधी)