सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी १९ ऑगस्टला राज्यव्यापी संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:41 AM2019-08-05T03:41:02+5:302019-08-05T06:40:26+5:30
खासगीकरणाविरोधात राज्यव्यापी संपाचा इशारा
मुंबई : सरकारी रुग्णालयांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी १९ ऑगस्टला एकदिवसीय राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. राज्यातील १७ वैद्यकीय महाविद्यालये आणि सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारी रुग्णालयांत रिक्त जागांवर कंत्राटी पद्धतीने खासगी कर्मचारी नेमण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारी रुग्णालयातील सेवांच्या खासगीकरणाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा विरोध आहे. रिक्त जागांवर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना संधी द्यावी, बदली कामगारांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदनही देण्यात आले होते, मात्र त्याची दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
याविषयी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी संघटनेचे सरचिटणीस चंद्रकांत पाटणे म्हणाले की, सरकार केवळ आश्वासने देत आहे. त्यात रुग्णालयातील वैद्यकीय सेवांचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. याला आमचा विरोध आहे. जे.जे. रुग्णालयातील कर्मचारी संघटनेच्या म्हणण्यानुसार, या रुग्णालयात सद्य:स्थितीत बाराशे कर्मचारी कार्यरत आहेत. यातील ७३४ कर्मचारी बदली कामगार आहेत.
‘रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर भरू नका’
राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघाचे मुंबई जिल्हा सरचिटणीस बापूराव वाघमारे यांनी सांगितले की, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयांतर्गत येणाºया सरकारी रुग्णालयांत कर्मचाºयांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी आहे. मात्र राज्य सरकार रिक्त जागा खासगी कंत्राटदारामार्फत भरण्याच्या विचारात आहे. याला आमचा विरोध आहे.