प्राप्तिकर विभागाच्या दोन निरीक्षकांना सक्तमजुरी
By admin | Published: December 30, 2016 07:58 PM2016-12-30T19:58:28+5:302016-12-30T22:18:09+5:30
सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांनी ३ वर्षांची सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - तब्बल साडेआठ लाख रुपयांचा दंड माफ करून देण्यासाठी दोन लाखांची लाच मागत त्यातील ५० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या दोन निरीक्षकांना सीबीआयचे विशेष न्यायाधीश डी. एम. देशमुख यांनी ३ वर्षांची सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हे दोन्हीही निरीक्षक प्राप्तिकर विभागाचे अधिकारी होते.
सचिन प्रवीणकुमार (वय २८), सुनीलकुमार इंद्रराज शर्मा (वय ४३) अशी शिक्षा झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुधाकर पवार यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार व्यावसायिक आहेत. त्यांना आर्थिक व्यवहारांमधील अनियमिततेबाबत साडेआठ लाख रुपयांचा दंड प्राप्तिकर विभागाने केला होता. हा दंड माफ करण्यासाठी प्रविणकुमार व शर्मा यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत त्यांनी सीबीआयकडे रितसर तक्रार दाखल केली.
सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुचनांनुसार त्यांनी दोघांना दूरध्वनी केला. लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये घेण्यासाठी आलेले हे दोघे २१ सप्टेंबर २०१५ रोजी रंगेहात सापडले. सीबीआयच्या अधिकारी शीतल शेंडगे या सापळा अधिकारी होत्या. कारवाई झाल्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरवत शिक्षा आणि दंड सुनावला. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. मनोज चलाडन यांनी काम पाहिले. तर पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी तपास अधिकारी म्हणून काम पाहिले.