कल्याण एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांना काविळीची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 02:42 AM2017-05-14T02:42:28+5:302017-05-14T02:42:28+5:30

एसटी डेपोतील अशुद्ध पाण्यामुळे २५ चालकवाहकांना काविळीची लागण झाली

Employees of Kalyan ST Depot | कल्याण एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांना काविळीची लागण

कल्याण एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांना काविळीची लागण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : एसटी डेपोतील अशुद्ध पाण्यामुळे २५ चालकवाहकांना काविळीची लागण झाली होती. त्यापैकी एका चालकाचा काविळीने मृत्यू झाल्याची बाब काही चालकवाहकांनी शुक्रवारी मनसेच्या निदर्शनास आणून दिली. डेपोतील स्वच्छता आणि अन्य समस्यांबाबत मनसेने डेपो व्यवस्थापक भामरे यांना जाब विचारल्याने जिल्हानियंत्रक अविनाश पाटील यांनी डेपोत धाव घेतली. त्यामुळे अवघ्या चार तासांत डेपोचे प्रसाधनगृह स्वच्छ करण्यात आले. मात्र, हा दिखावा एक दिवसापुरता नको, त्यात सातत्य पाहिजे. स्वच्छतेबाबत पुन्हा चार दिवसांनी मनसे पाहणी करेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
‘लोकमत’ने ‘हॅलो ठाणे’ पुरवणीत ८ मे रोजी ‘रिपोर्टर आॅन दी स्पॉट’ या सदरात कल्याण बस डेपोच्या असुविधांवर प्रकाश टाकला होता. या वृत्ताची दखल घेत शुक्रवारी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, नेते काका मांडले, प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, पदाधिकारी सागर जेधे यांनी कल्याण बस डेपोची पाहणी केली. तेथे त्यांना चालकवाहकांच्या विश्रामगृहातील प्रसाधनगृह अस्वच्छ दिसले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. गच्चीवरील टाकीत कबुतर मरून पडले होते. या विश्रामगृहाचा ६०० चालकवाहक लाभ घेतात. आतापर्यंत २५ चालकवाहकांना कावीळ झाली होती. त्यापैकी एका चालकाचा काविळीने मृत्यू झाल्याची बाब काही चालकवाहकांनी निदर्शनास आणली. प्रवाशांसाठी असलेल्या प्रसाधनगृहाची मलवाहिनी फुटल्याने मलमिश्रित पाणी डेपोच्या आवारातील रस्त्यावर वाहते. याप्रकरणी मनसेने डेपो भामरे यांना जाब विचारला. त्यावर, आम्ही वेळोवेळी स्वच्छता करून घेतो. मात्र, वाहकचालकांनचा शिस्त नाही, असे भामरे यांनी सांगितले. त्यांनी स्वच्छता कंत्राटदाराच्या माणसाला बोलावले. त्यावर त्याच्याकडून स्वच्छताच होत नसल्याचा आरोप मनसेने केला. या वेळी भामरे यांनी माझ्या हातात काही नाही. सर्व अधिकार जिल्हानियंत्रक पाटील यांना आहेत. मी केवळ पाठपुरावा करते, असे भामरे यांनी सांगतेच पदाधिकारी संतप्त झाले.
मनसेने पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी साडेचार वाजता मी कल्याण डेपोत येतो, असे सांगितले. डेपोची देखभाल-दुरुस्ती करणाऱ्यासही पदाधिकाऱ्यांनी फोन केला असता पदाधिकारी सांगत असलेली समस्या चिल्लर असल्याचे त्यांनी सांगताच पदाधिकारी संतापले. चालक, वाहक व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले असताना स्वच्छता होत नसल्याची बाब चिल्लर वाटत असेल, तर कबुतर मरून पडलेल्या टाकीतील पाणी तुम्हाला पाजतो, असा दमच पदाधिकाऱ्यांनी भरला.
दरम्यान, पाटील यांनी साडेचार वाजता कल्याण डेपोत येण्याचे कबूल केले होते. त्यावेळी मनसेचे शिष्टमंडळ तेथे पोहोचले असता पाटील यांनी त्या आधीच डेपोची पाहणी करून विठ्ठलवाडी डेपोकडे जाणे पसंत केले. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी त्यांना विठ्ठलवाडी डेपोत बोलावले. त्यामुळे ते तेथे गेले. मनसेने कल्याण डेपोच्या स्वच्छतेचे साडेसात लाख रुपयांचे कंत्राट ३० वर्षे करारावर खाजगी कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, त्याच्याकडून नीट स्वच्छता होत नाही. डेपो व्यवस्थापनाने त्याच्याकडून सातत्याने स्वच्छता करून घेतली पाहिजे, असे त्यांना सुनावले.
>स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल अद्याप नाही
कल्याण डेपोची इमारत १९७२ मध्ये बांधली आहे. इमारत जुनी झाली असल्याने तिचे स्ट्रक्टरल आॅडिट केले आहे. मात्र, त्याचा अहवाल अद्याप प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बस डेपोच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी वास्तुविशारद नेमले आहेत. स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल प्राप्त होताच महामंडळाच्या निधीतून डेपोचा विकास केला जाणार आहे. राज्यातील ४० बस डेपो विकसित केले जाणार आहेत, अशी माहिती या चर्चेतून समोर आली आहे.

Web Title: Employees of Kalyan ST Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.