महावितरणच्या कर्मचा-यांना लुटले
By admin | Published: May 10, 2014 04:50 PM2014-05-10T16:50:59+5:302014-05-10T20:36:10+5:30
जमा झालेली रोख रक्कम व धनादेश गोळा करुन ते मुख्य शाखेत भरण्याचे काम करणा-या तरुणाला अडवून डोळ्यात मिरचीपुड टाकून लुटण्यात आले.
पुणे : महावितरणच्या विविध केंद्रांवरील एटीपी मशिनमधील जमा झालेली रोख रक्कम व धनादेश गोळा करुन ते मुख्य शाखेत भरण्याचे काम करणा-या तरुणाला अडवून डोळ्यात मिरचीपुड टाकून लुटण्यात आले. निलायम सिनेमागृहासमोरील अजंठा लॉजसमोर शुक्रवारी संध्याकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी २ लाख ३० हजार ६६० रुपयांची रोकड आणि ५३ धनादेश पळवले.
अविनाश नामदेव चव्हाण (वय २६, रा. समर्थ हॉस्टेल, कुमठेकर रस्ता) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हे महावितरणच्या एटीपी मशिनमध्ये जमा झालेली रक्कम व धनादेश गोळा करण्याचे काम करतात. शुक्रवारी संध्याकाळी चव्हाण हे त्यांचे सहकारी प्रभु शामराव शिंगे यांच्यासह निलायम सिनेमागृहासमोरील महावितरणच्या कार्यालयातील मशिनमध्ये जमा झालेली रक्कम आणि ५३ धनादेश घेऊन जात होते. मोटार सायकलवरुन आलेल्या दोघाजणांनी त्यांना अजंठा लॉजसमोर अडवले. त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची पुड ताकून शिंगे याच्या हातातील बॅग चोरुन नेली.