आईच्या अंत्यविधीस गेल्याने कर्मचारी निलंबित
By admin | Published: September 17, 2016 02:55 AM2016-09-17T02:55:39+5:302016-09-17T02:55:39+5:30
मुलाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला वरिष्ठांकडून असंवेदनशीलता आणि माणसुकीशून्य कारभाराचा अनुभव आला असताना हाच प्रकार कल्याण-डोंबिवली महापालिकेत
कल्याण : मुलाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्याला वरिष्ठांकडून असंवेदनशीलता आणि माणसुकीशून्य कारभाराचा अनुभव आला असताना हाच प्रकार कल्याण-डोंबिवली महापालिकेत वसंत सोलंकी या कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडला. आईचे निधन झाल्याने विनापरवानगी गैरहजर राहिलेल्या सोलंकीला सेवेतून निलंबित करून त्याचे निलंबनकाळातील वेतनही कापल्याचे उघड झाले. या अन्यायाविरोधात सोलंकीने स्थायीला विनंती अर्ज करून साकडे घातले होते. या प्रकरणी प्रशासनाला शुक्रवारी स्थायीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी धारेवर धरले. यावर चौकशी करून पुढील सभेत अहवाल ठेवला जाईल, असे स्पष्टीकरण उपायुक्त सुनील लहाने यांनी दिले.
जानेवारीमध्ये तो क प्रभाग क्षेत्रात बेकायदा फेरीवाले हटाव मोहिमेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. दरम्यान, त्याच्या आईचे ८ जानेवारीला निधन झाले. आईच्या अंत्यविधीला जाण्यासाठी तो कामावर गेला नाही. आईच्या अंत्ययात्रेला महापालिकेचे
अनेक कर्मचारीही उपस्थित
होते. अंत्यविधीनंतर ८ ते २२ जानेवारीपर्यंत हक्काची रजा मिळावी, असा अर्ज सोलंकीने केला होता. परंतु, वरिष्ठांच्या चुकीच्या अभिप्रायामुळे २० जानेवारीला त्याला सेवेतून निलंबित केले. आपल्यावर अन्यायकारक कारवाई झाल्याकडे सोलंकी याने अर्जात लक्ष
वेधले. याबाबत, याआधी आयुक्त ई. रवींद्रन आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त दीपक पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले.