कर्मचारी करणार ‘लेखणी बंद’
By Admin | Published: September 7, 2016 05:45 AM2016-09-07T05:45:45+5:302016-09-07T05:45:45+5:30
सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मुंबई : सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी करत महासंघाने २२ सप्टेंबर रोजी ‘लेखणी बंद’ आंदोलनाची हाक दिली आहे.
महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे म्हणाले
की, कर्तव्यावर असताना सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण होण्याच्या प्रकरणांत गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. मारहाण व दमबाजी करणाऱ्यांचे सदस्यत्व संबंधित संस्थेमधून रद्द करावे आणि दोषींवर मोक्का लावण्याची तरतूद करावी, अशी महासंघाची मागणी आहे. मात्र यासंदर्भात निवेदन पाठवूनही शासनाने अपेक्षित निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच शासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा पवित्रा महासंघाने घेतला आहे.
महासंघाने घोषित केलेल्या आंदोलनानुसार, मारहाण व दमबाजी करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून मंगळवारी, २० सप्टेंबरला काळ्याफिती लावून अधिकारी काम करतील. तर परिणामकारक कायद्याच्या मागणीसंबंधी शासनाच्या चालढकलीचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी, २१ सप्टेंबरला काळ्याफिती लावून निषेध व्यक्त केला जाईल.
शासनाने दोन्ही दिवसांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर मोक्काचा आग्रह धरत राज्यातील
सर्व खात्यांतील वर्ग १ व वर्ग २चे
१ लाख २० हजार अधिकारी गुरुवारी, २२ सप्टेंबर रोजी काळ्याफिती
लावून ‘लेखणी बंद’ आंदोलन करतील.
नागरिकांना त्रास नाही
महासंघाने २२ सप्टेंबरला पुकारलेल्या ‘लेखणी बंद’ आंदोलनात सरकारी अधिकारी कामावर हजर असतील. तक्रारी किंवा गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्या सर्व नागरिकांचे म्हणणे अधिकारी ऐकून घेतील; शिवाय त्यांवरील उपाययोजनाही करतील. मात्र या वेळी एकही अधिकारी लेखणी उचलणार नाही, असे महासंघाने स्पष्ट केले.