विम्याचे पैसे वाढवल्याने मालक त्रस्त
By admin | Published: April 8, 2017 03:02 AM2017-04-08T03:02:13+5:302017-04-08T03:02:13+5:30
नवीन शैक्षणिक वर्षात स्कूलबसच्या शुल्कात वाढ करण्यात येणार असल्याने अनेक पालकांच्या कपाळाला आठ्या पडल्या आहेत.
मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षात स्कूलबसच्या शुल्कात वाढ करण्यात येणार असल्याने अनेक पालकांच्या कपाळाला आठ्या पडल्या आहेत. पण, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने विम्याची रक्कम वाढवल्याने याचा फटका बस मालकांना बसणार आहे. त्यामुळे मालकांना बसणाऱ्या फटक्याविरुद्ध संपाचे हत्यार उगारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर वाढवला असून, हफ्त्यामध्येही वाढ केली आहे. यामुळे मोटार मालकांना याचा चांगलाच फटका बसणार आहे. मालकांना अन्य गोष्टींचा आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यातच आता हफ्त्याचा भार पडणार आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी कर आणि हफ्ता कमी करावा, अशी मागणी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्टने मागणी केली आहे. पण, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शनिवारी पुण्यात एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत चर्चा करून चक्का जाम आंदोलन करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.
पुण्यात होणाऱ्या बैठकीत महाराष्ट्र ट्रक, टँकर, बस वाहतूक महासंघाचे पदाधिकारी एकत्र येणार आहेत. या वेळी स्कूलबसचे मालकही यात सहभागी होणार आहेत. त्यांनी संपाचा निर्णय घेतल्यास स्कूलबस मालकही संपात सहभागी होणार आहेत. स्कूलबस चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतल्यास विद्यार्थी आणि पालकांचे हाल होऊ शकतात. अजूनही अनेक शाळांच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यास गैरसोय होऊ शकते. महागाई वाढल्याने बसचालकांच्या खर्चात कितीतरी टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य सेवासुविधा देण्यासाठी बदल केले आहेत. त्यात आता विम्याचा खर्च वाढला असल्याचे गर्ग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)