रोजगार हमी कामावर दिव्यांगांनाही घेणार;वर्षातील किमान १०० दिवस रोजगार देण्याची हमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 08:47 PM2020-06-13T20:47:36+5:302020-06-13T20:58:11+5:30
राज्य दिव्यांग कल्याण विभागाचा अध्यादेश जारी
पुणे: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत आता दिव्यांग व्यक्तींनाही सामावून घेण्यात येणार आहे. तसा अध्यादेशच राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी जारी केला आहे.
कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे किंबहून त्यांच्यापेक्षा जास्त हाल दिव्यांग व्यक्तींचे झाले. त्यांचा सुरू असलेले रोजगार बुडाला. घरी बसून रहावे लागले. त्यातही शहरी भागातील दिव्यांगांना किमान काही सुविधांमुळे तसेच कुटुंबियांमुळे जगणे सुसह्य होते, ग्रामीण भागातील दिव्यांगांना मात्र हालच सहन करावे लागतात. त्यामुळेच सरकारने त्यांना या योजनेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला.
या रोजगार हमी योजनेत सरकारने वर्षातील किमान १०० दिवस रोजगार देण्याची हमी दिली आहे. त्यासाठी संबधित नागरिकाला त्याच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामावर जाऊन त्याचे जॉब कार्ड तयार करून घ्यावे लागते. ते केले की त्याला कामावर हजर करून घेतले जाते. आता दिव्यांग व्यक्तींनाही त्यांचे जॉब कार्ड तयार करून घेता येईल. त्यांना कोणती कामे द्यायची ते सरकारने निश्चित केले आहे. तेच काम त्यांना द्यावे असे आदेशात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगांना या कामात सामावून घेता येईल.