केज कल्चर प्रणालीतून रोजगाराच्या संधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 05:17 AM2016-09-10T05:17:06+5:302016-09-10T05:17:06+5:30
पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनाच्या (केज कल्चर प्रणाली) माध्यमातून सुमारे एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मुंबई : पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनाच्या (केज कल्चर प्रणाली) माध्यमातून सुमारे एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्या माध्यमातून महाराष्ट्राला मत्स्यव्यवसायात अव्वलस्थानी नेण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.
तारापोरवाला मत्स्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जानकर बोलत होते. या वेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, मत्स्यविकास आयुक्त मधुकर गायकवाड, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे कार्यकारी संचालक अरुण शंदे उपस्थित होते. जानकर म्हणाले की, केज कल्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रमुख उद्देश असून, त्या माध्यमातून रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. देशात आंध्र प्रदेश मत्स्यव्यवसायात अव्वल स्थानावर असून, महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. येत्या काळात महाराष्ट्राला देशात मत्स्यव्यवसायात अव्वल क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जानकर यांनी या वेळी सांगितले. आदिवासी असलेला कातकरी समाज हा मत्स्यव्यवसायात असून, मत्स्य व्यवसायाच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावण्यात येणार असल्याचे जानकर यांनी या वेळी सांगितले. खोतकर या वेळी म्हणाले की, गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादन १.५ मेट्रिक टन असून, येत्या वर्षात ते दुपटीने वाढवून ३ मेट्रिक टनापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे खोतकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)