पोलिसांच्या कुटुंबीयांना रोजगार देणार - केसकर
By admin | Published: April 20, 2017 05:18 AM2017-04-20T05:18:22+5:302017-04-20T05:18:22+5:30
जनतेच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजाविणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध व्हावा
कोल्हापूर : जनतेच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा बजाविणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रोजगार मेळावे घेऊन, त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
केसरकर यांनी कोल्हापूर पोलीस दलाच्या कामकाजासंबंधी बुधवारी पोलीस मुख्यालयात आढावा बैठक घेतली. या वेळी दाखल गुन्हे, पोलीस प्रशासनास उद्भवणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. घरफोड्या, चोऱ्यांचे प्रमाण वाढते आहे, ते रोखण्यासाठी रात्रगस्त वाढवा, सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा, अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
युवती व महिलांच्या सुरक्षेसाठी सर्व स्तरांवर मोहिमा राबविल्या जात आहेत. एखादी महिला कुठेही अडचणीत आली, तर तिच्याजवळ एक अॅप (रिमोट) असेल, त्याचे बटण तिने दाबले की, काही वेळांतच तिच्याजवळ पोलीस पोहोचतील, असे नवे तंत्रज्ञान पुढे आणले जाणार आहे. ग्रामीण भागात पोलिस सुरक्षा दल स्थापन करण्यात येणार आहे. त्यांना काही अधिकारही दिले जाणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळण्यासाठी स्वतंत्रपणे अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. बैठकीस पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांच्यासह अधिकारी व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)