पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून देशातील २४ लाखांवर युवकांना राेजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 07:26 AM2023-07-15T07:26:26+5:302023-07-15T07:26:36+5:30
पीएमकेव्हीवाय १.०, पीएमकेव्हीवाय २.० आणि पीएमकेव्हीवाय ३.० नंतर आता पीएमकेव्हीवाय ४.० या चौथ्या टप्प्यातील कार्यवाही सुरू झाली आहे.
महेश घोराळे
मुंबई : तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने शासनाने पंतप्रधान कौशल्य विकास योजना १५ जुलै २०१५ मध्ये सुरू केली. या योजनेचे आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण झाले असून चौथ्या टप्प्याच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंतच्या पहिल्या तीन टप्प्यात देशात नोंदणी केलेल्यांपैकी १७.१८ टक्के युवकांना प्लेसमेंट मिळाले आहे. तर महाराष्ट्रातून नोंदणीपैकी ६.९३ टक्के युवकांना प्लेसमेंट मिळाल्याचे पीएमकेव्हीवाय पोर्टलवरून दिसून येते.
चौथ्या टप्प्याला सुरूवात
पीएमकेव्हीवाय १.०, पीएमकेव्हीवाय २.० आणि पीएमकेव्हीवाय ३.० नंतर आता पीएमकेव्हीवाय ४.० या चौथ्या टप्प्यातील कार्यवाही सुरू झाली आहे. यामध्ये नव्या व विकसित उद्योगांच्या वाढत्या कौशल्य विषयक गरजा लक्षात घेऊन आखणी करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी २०२६ पर्यंत करण्यात येईल.
सीसीएतून रोजगार
पीएमकेव्हीवाय अंतर्गत सीसीए (कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह) हा दोन महिन्याचा कोर्स मी नुकताच पूर्ण केला आहे. नियमीत प्रशिक्षण क्लासेस पूर्ण झाले आहेत. या माध्यमातूनच मला रोजगार मिळाला आहे. एका लोकल सर्च इंजिन कंपनीत मला मुलाखतीच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. - गणेश भगेवार, तळेगाव वडनेर, ता. तेल्हारा, जि. अकोला
घटक | देशाची स्थिती | महाराष्ट्राची स्थिती |
नोंदणीकृत उमेद्वार | १,४२,६५,६८१ | १३,२२,८७२ |
प्रशिक्षीत उमेदवार | १,३७,२४,२२६ | १२,८६,९५१ |
मूल्यांकन केलेले उमेदवार | १,२४,५४,५९३ | ११,५४,९०४ |
प्रमाणपत्र प्राप्त | १,१०,३४,२८५ | १०,२७,३५४ |
प्लेसमेंट | २४,५१,४०३ | ९१,७१० |