‘रिकाम्या’ पवारांना गांभीर्याने घेऊ नये!

By admin | Published: November 20, 2014 02:35 AM2014-11-20T02:35:56+5:302014-11-20T02:35:56+5:30

एमआयएम आणि भाजपा ही दोन टोकं आहेत. अगदी दिवस आणि रात्रीसारखी.

'Empty' Pawar should not be taken seriously! | ‘रिकाम्या’ पवारांना गांभीर्याने घेऊ नये!

‘रिकाम्या’ पवारांना गांभीर्याने घेऊ नये!

Next

अतुल कुलकर्णी, मुंबई
एमआयएम आणि भाजपा ही दोन टोकं आहेत. अगदी दिवस आणि रात्रीसारखी. जी कधीही एकत्र येणार नाहीत. मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना सध्या रिकामेपणा खूप आहे. त्यामुळे त्यांना एमआयएमच्या पाठीशी भाजपा दिसत आहे़ त्यांचे म्हणणे फारसे गांभीर्याने कोणी घेऊ नये, अशा शब्दांत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. त्याचवेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमविषयी केलेल्या विधानाचे आपण स्वागत करतो, असेही खडसे म्हणाले.
सदर प्रतिनिधीशी बोलताना खडसे म्हणाले, की सध्या देशात आणि राज्यात त्यांच्याकडे सत्ता नसल्यामुळे पवारांना रिकामेपण आलेले आहे. माध्यमंंदेखील पवार जे बोलतात ते करतातच असे नाही, अशी टीका करू लागली आहेत. त्यामुळे त्यांचे विधान कोणी गंभीरपणे घेऊ नये.
काही दिवसांपूर्वी आ. प्रणिती शिंदे यांनी ‘एमआयएम देशद्रोही आहेत, अशा देशद्रोह्यांना आपल्या देशात जागा नसावी़ मग अतिरेकी आणि त्यांच्यात फरक काय राहिला,’ असे विधान केले होते. त्यावर एमआयएमने त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवली. हे प्रकरण तेथेच थांबले होते; मात्र शरद पवार यांनी एमआयएमच्या मागे भाजपा असल्याचा आरोप करून नवेच कोलीत लावले. त्यावर खडसे म्हणाले, प्रणितींनी जे विधान केले, त्याचे मी स्वागत करतो. विषारी भाषणं देशाला परवडणारी नाहीत. काही राजकीय पक्षांना याचा तत्कालीन फायदा वाटेल, पण दीर्घकालीन विचार केला तर हे अत्यंत घातक आहे. एमआयएम आणि भाजपा स्वप्नात देखील एकत्र येणार नाहीत. मात्र अशा प्रवृत्ती वाढीस लागल्या तर देशाच्या एकात्मतेवरचा तो घाला असेल, असेही खडसे या वेळी म्हणाले.

Web Title: 'Empty' Pawar should not be taken seriously!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.